राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता; एनआयएने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 06:01 PM2024-09-09T18:01:13+5:302024-09-09T18:02:40+5:30
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी भाजपाचे कार्यालय उडवण्याचा कट होता, असा खुलासा एनआयए'ने मोठा खुलासा केला आहे.
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या स्फोटामागे ISIS दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात मुसावीर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ यांची नावे आरोपी म्हणून ठेवली आहेत. दरम्यान, आता एनआयएने आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, शाजिबने कॅफेमध्ये बॉम्ब पेरले होते. अहमद ताहा यानेही त्यांना यात मदत केली. दोघेही यापूर्वी ISIS शी संबंधित होते. या दोन्ही दहशतवाद्यांनी ISIS ची विचारधारा पसरवण्याचे काम केले आणि इतर मुस्लिम तरुणांनाही त्यात सामील करून घेण्यासाठी मोहीम चालवली. इतर दोन आरोपी माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ हे असे तरुण आहेत ज्यांना त्याने फसवले होते.
रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटापूर्वी दोन्ही दहशतवाद्यांनी आणखी अनेक हल्ल्यांची योजना आखली होती, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. एनआयएच्या दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या दिवशी भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयईडी स्फोट घडवण्याची दहशतवादी योजना आखत होते.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ताहा आणि शाजिब या दोघांना त्यांच्या हँडलरद्वारे क्रिप्टो चलनाद्वारे पैशांचा पुरवठा केला जात होता, याचे त्यांनी विविध टेलिग्राम आधारित पी2पी प्लॅटफॉर्मच्या मदतीने फियाटमध्ये रूपांतर केले. हे पैसे आरोपींनी बंगळुरूमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय मल्लेश्वरम, बंगळुरू येथील भाजप कार्यालयात स्फोटाची योजना आखण्यात आली होती, पण ती अयशस्वी ठरली. यानंतर दोन मुख्य आरोपींनी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाची योजना आखली होती.