अस्थाना यांच्याविरुद्ध ठोस पुरावे होते- अजय बस्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 02:39 AM2020-02-29T02:39:07+5:302020-02-29T02:39:16+5:30
लाचखोरीच्या प्रकरणात अस्थाना यांना क्लिन चीट देण्यात आली होती. कोर्टाने १२ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
नवी दिल्ली : सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध लाचखोरीबाबत ठोस पुरावे होते. विद्यमान चौकशी अधिकारी सतीश डागर हे अस्थाना आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे या प्रकरणातील माजी चौकशी अधिकारी अजय कुमार बस्सी यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश संजय अग्रवाल यांना सांगितले.
लाचखोरीच्या प्रकरणात अस्थाना यांना क्लिन चीट देण्यात आली होती. कोर्टाने १२ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
एकीकडे सीबीआयने त्यांच्या पोलीस उपअधीक्षकांना अटक केली असताना याप्रकरणात मोठी भूमिका असलेले आरोपी मात्र खुलेआम का फिरत आहेत? असा सवालही कोर्टाने केला होता.
अस्थाना आणि पोलीस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांची नावे आरोपपत्रातील बाराव्या रकान्यात होती. कारण त्यांना आरोपी करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते. २०१८ मध्ये देवेंद्र कुमार यांना सीबीआयने अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला होता. बस्सी यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे़