बाजारात आली "बाहुबली" साडी, खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड
By Admin | Published: May 3, 2017 05:52 PM2017-05-03T17:52:21+5:302017-05-03T17:52:21+5:30
बाहुबलीच्या प्रसिद्धीचा फायदा घेत बाहुबली साडी मार्केटमध्ये आणण्यात आली आहे
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 3 - बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बाहुबली चित्रपटामुळे निर्मात्यांना प्रचंड फायदा झाला असून छोट्या मोठ्या उद्योजकांसाठीही बाहुबली चित्रपट फायद्याचा ठरला आहे. बाहुबलीच्या प्रसिद्धीचा फायदा घेत बाहुबली साडी मार्केटमध्ये आणण्यात आली आहे. फक्त साडीच नाही तर बाहूबली दागिने आणि बर्गरही मार्कटमध्ये आलं आहे.
हैदराबादमधील फॅशन ब्रॅण्ड जाजूने बाहुबलीच्या प्रसिद्धीचा फायदा घेत साडी बाजारात आणली आहे. या साडीवर बाहुबलीच्या कलाकारांचे फोटो छापण्यात आले आहेत. चित्रपटातील मुख्य कलाकार प्रभास, तमन्ना, अनुष्का शेट्टी यांचे फोटो या साड्यांवर आहेत. मोठ्या प्रमाणात या साड्यांचं प्रमोशन केलं जात असून महिलांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. साड्या विकत घेण्यासाठी लोकांची अक्षरक्ष झुंबड उडाल्याचं मालक नवनीथ यांनी सांगितलं आहे.
"साड्यांच्या डिझाईनचे फोटो लीक कसे झाले याची आम्हाला कल्पना नाही. पण फोटो लीक झाल्यापासून आम्हाला खूप ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. साड्यांची किंमत 350 ते 400 पर्यंत आहे. तर दुस-या रेंजमधील साड्यांची किंमत 1000 पासून ते 1100 पर्यंत आहेत. महागड्या साड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे", असं नवनीथ यांनी सांगितलं आहे.
"साड्यांचे अजून डिजाईन्स उपलब्ध असून अद्याप ते आलेले नाहीत. आम्ही काही नव्या डिजाईन्सही प्रिंट केल्या असून त्यासाठी लोकांनी आधीच ऑर्डर देऊन ठेवली आहे. साड्यांची मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचं", ते बोलले आहेत.
बाहुबली 2 चित्रपटाने चार दिवसात 620 कोटींची कमाई केली आहे. जगभरात हा चित्रपट जवळपास 9000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेसह 6 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला.