पंतप्रधानपदाची अभिलाषा नव्हतीच
By admin | Published: January 29, 2016 01:03 AM2016-01-29T01:03:21+5:302016-01-29T01:03:21+5:30
पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून
नवी दिल्ली : पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून चालत असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम दिला आहे. अशाप्रकारच्या अफवा खोट्या आणि द्वेषपूर्ण असल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
‘द टर्ब्युलंट इयर्स : १९८०-९६’ या आपल्या जीवनचरित्राच्या दुसऱ्या खंडात मुखर्जी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन गुरुवारी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात मुखर्जी म्हणतात, ‘माझी हंगामी पंतप्रधान बनायची इच्छा होती, त्या पदासाठी मी दावा केलेला होता आणि नंतर माझे मन वळविण्यात आले होते वगैरेसारख्या अनेक खोट्या गोष्टी पसरविण्यात आल्या. अशा खोट्या गोष्टींमुळेच राजीव गांधी यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले होते. अशा गोष्टी पूर्णपणे खोट्या आणि द्वेषपूर्ण आहेत.’ रूपा प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. बाथरूममध्ये राजीव गांधी यांच्यासोबत पंतप्रधानपदाबाबत झालेल्या संभाषणाचा तपशीलही मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिला आहे. ‘वेळ पुढे सरकत होती आणि मला त्यांच्याशी बोलायची घाई झाली होती. मी त्यांच्याकडे (राजीव गांधी आणि सोनिया गांधी) गेलो आणि राजीव गांधींच्या खांद्यावर हळूच हात ठेवला आणि मला काही महत्त्वाचे बोलायचे आहे, असा संकेत दिला. ते सोनियांपासून दूर केले आणि माझ्याशी बोलले. गोपनीय मुद्दा असल्याशिवाय मी त्रास देणार नाही, हे समजल्यावर ते मला बाथरूममध्ये घेऊन गेले, कारण आम्ही कुणाच्याही लक्षात न येता बोलू शकू,’ असेही मुखर्जी यांनी यात नमूद केले आहे. यावेळी मुखर्जी आणि राजीव गांधी यांच्यात राजकीय परिस्थितीवर आणि राजीव यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याबाबत पक्षाच्या अन्य नेत्यांचे काय मत आहे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राजीव पंतप्रधान बनण्यास राजी झाले. त्यांचा निर्णय सर्वांना कळविला,’ असे मुखर्जी यांनी लिहिले आहे.
- राजीव गांधी मंत्रिमंडळातून आणि त्यानंतर काँग्रेस पक्षातून काढण्याला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचाही ऊहापोह मुखर्जी यांनी यात केला आहे. ‘राजीव गांधींची वाढती नाराजी, त्यांच्या भोवतालच्या नेत्यांच्या मनातील वैर आणि संभाव्य कारवाईची पूर्वकल्पना आपल्याला आलेली होती. त्यांनी मला मंत्रिमंडळातून का वगळले आणि नंतर पक्षातून बडतर्फ का केले? यावर मी एवढेच सांगू शकतो की त्यांनी चूक केली. मीदेखील चुका केल्या. ते इतरांच्या प्रभावात आले आणि त्यांनी माझ्याविरुद्ध चुगली करणाऱ्यांचे ऐकले,’ असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे.