नोटाबंदीच्या काळात एकही बनावट नोट मिळाली नाही
By admin | Published: January 22, 2017 05:11 AM2017-01-22T05:11:55+5:302017-01-22T05:11:55+5:30
८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या ५० दिवसांच्या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अखत्यारीतील तपासी संस्थांनी देशभरात केलेल्या
नवी दिल्ली : ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या ५० दिवसांच्या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अखत्यारीतील तपासी संस्थांनी देशभरात केलेल्या कारवाईत ५०० व एक हजार रुपयांची एकही बनावट नोट हस्तगत करण्यात आली नाही, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने संसदेच्या लोकलेखा समितीस दिली आहे.
दि. ९ नोव्हेंबर ते ४ जानेवारी या काळात प्राप्तिकर
विभागाने विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये ४३४.३७ कोटी रुपयांच्या नव्या व बाद नोटा हस्तगत केल्या. पण या नोटा ज्यांच्याकडे मिळाल्या त्यांचा दहशतवाद्यांशी वा तस्करांशी संबंध असल्याची माहिती पुढे आलेली नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
काळ््या पैशास आळा घालणे, बनावट चलनी नोटांचा प्रसार रोखणे आणि दहशतवाद्यांचा पैशचा स्रोत बंद करणे या तीन प्रमुख उद्देशांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. संसदीय समितीस दिलेली ही माहिती लक्षणीय आहे कारण यापैकी एकही उद्देश कदाचित सफल झाला नसावा, असे त्यावरून सूचित होते. नोटाबंदीमुळे नेमका किती काळा पैसा उघड झाला, हे सरकार वा रिझर्व्ह बँक अद्याप सांगू शकलेले नाही. त्यातच बनावट चलन आणि दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा रोखण्यातही नोटाबंदीचा उपयोग झाला नसल्याचे कबूल केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सरकारची आकडेवारी
प्राप्तिकर विभागाकडून 437 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त. त्यापैकी ११२ कोटी रुपयांच्या नव्या नोटा.
महसूल गुप्तवार्ता विभागाच्या कारवाईत तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त. हवाला दलालांवर ६३ ठिकाणी केलेल्या कारवाईत एक कोटीच्या जुन्या, २० लाखांच्या नव्या नोटा व ५० लाखांचे विदेशी चलन जप्त.गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर या काळात जप्त झालेल्या बेहिशेबी मालमत्तेत दुप्पट तर उघड झालेल्या बेहिशेबी उत्पन्नात 51% वाढ झाली आहे.