नियंत्रण रेषेवर झाला नाही गोळीबार, भारतीय जवानांवर हल्ल्यासाठी चिन्यांनी वापरले हे हत्यार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:02 PM2020-06-16T17:02:52+5:302020-06-16T17:36:50+5:30
गलवान खोऱ्यात आज भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीवेळी सीमारेषेवर गोळीबार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
लेह (लडाख) - लडाखमधील गलवान घाटी परिसरातील गलवान खोऱ्यात आज भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये उडालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर चीनचे पाच सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या झटापटीवेळी सीमारेषेवर गोळीबार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जेव्हा बॉर्डर कमांडर पातळीवर बैठक झाली तेव्हा पीपी१४-१५-१७ येथे चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाईल असे निश्चित झाले. मात्र चीनी सैनिकांनी हे मान्य करण्यास नकार दिला. भारताच्या बाजूने त्यांना वारंवार समजावून सांगण्यात आले. मात्र चीनी सैनिकांनी हल्ला केला.
चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक केली. त्यांच्याकडे लोखंडी नाल आणि खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. या झटापटीत जे अधिकारी बैठकीचे नेतृत्व करत होते त्यांना गंभीर जखमा झाल्या. या झटापटीत भारताचे १० ते १२ जवान जखमी झाले आहेत. तर चीनचेसुद्धा एवढेच जवान गंभीर जखमी झाले आहेत. मात्र याबाबत लष्कराकडून अधिकृत माहिती आलेली नाही.
मात्र या झटापटीनंतर चीनने भारतावरच उलटा आरोप केला आहे. भारताकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्यावर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. आता भारताने कुठली एकतर्फी कारवाई करू नये, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सीमेवरची ती चकमक ज्यात भारतीय लष्कराने चीनला दिला होता धोबीपछाड
त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप
जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली
गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन
coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार गलवान खोऱ्यात सोमवारी डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. या झटापटीत लष्कराच्या एक अधिकारी आणि दोन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी बैठक घेत आहेत.