...म्हणून मी उघड्यावर लघुशंकेला गेलो; भाजपा मंत्र्याची सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:11 PM2018-10-08T18:11:53+5:302018-10-08T18:17:11+5:30
मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरजवळ लघुशंका करणाऱ्या मंत्र्याचा फोटो वायरल
अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचा आग्रह धरत असताना, त्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवत असताना भाजपाचेच नेते याबद्दल फारसे गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री असलेले शंभू सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ते उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहे. यावरुन टीका झाल्यावर शंभू सिंह यांनी सारवासारव करत, त्या भागात दूरदूरपर्यंत शौचालय नसल्यानं उघड्यावर गेलो, असं प्रसारमाध्यमांना सांगितलं. उघड्यावर शौचास न जाणं, हा काही स्वच्छता अभियानाचा एकमेव भाग नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.
शंभू सिंह यांचा फोटो हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. सिंह यांच्या कृतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. पण या प्रकाराचा कुठलाही खेद वा खंत नसलेल्या या मंत्रिमहोदयांनी आधी आपल्या कृतीचं समर्थनच केलं. उघड्यावर लघुशंका करणे ही आपली जुनी परंपरा आहे, असं सिंह म्हणाले. यानंतर सोशल मीडियानं सिंह यांना धारेवर धरलं. 'त्या ठिकाणी कित्येक किलोमीटरपर्यंत स्वच्छतागृह नव्हतं. म्हणून मी उघड्यावर लघुशंकेला गेलो,' अशी सारवासारव त्यांनी केली.
As far as Swachh Bharat Abhiyan is concerned, urination alone doesn't contribute to uncleanliness. That place did not have urinals for kilometers at a stretch: Shambhu Singh Khetsar, Rajasthan Minister on viral picture of him urinating in open on a wall in Ajmer (07.10.2018) pic.twitter.com/kY0BEgpzpX
— ANI (@ANI) October 8, 2018
विशेष म्हणजे शंभू सिंह ज्या ठिकाणी लघुशंकेला गेले, तिथे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. वसुंधरा राजे यांचा फोटो असलेल्या पोस्टरच्या बाजूलाच सिंह यांनी लघुशंका केली. त्या पोस्टरच्या बाजूला मंडप घालण्यात आला होता. याच ठिकाणी भाजपाची रॅली होती. शंभू सिंह यांच्या या कृतीमुळे मोदींच्या स्वच्छता अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.