विमानातील सोनूचे गाणे आले अंगाशी
By admin | Published: February 6, 2016 03:48 AM2016-02-06T03:48:24+5:302016-02-06T03:48:24+5:30
सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याला विमानातील उद्घोषणा प्रणालीचा वापर करून बॉलीवूड गीत गाण्याची परवानगी देणे जेट एअरवेजच्या चार्टर्ड विमानातील चालक दलाच्या पाच सदस्यांना चांगलेच महागात पडले.
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याला विमानातील उद्घोषणा प्रणालीचा वापर करून बॉलीवूड गीत गाण्याची परवानगी देणे जेट एअरवेजच्या चार्टर्ड विमानातील चालक दलाच्या पाच सदस्यांना चांगलेच महागात पडले. जेट एअरवेजने या प्रकरणी संबंधित पाचही सदस्यांना निलंबित केले. मात्र या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे म्हणजे असहिष्णुताच आहे, अशी प्रतिक्रिया सोनू निगमने व्यक्त केली आहे.
नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. जोधपूरहून मुंबईला निघालेल्या विमानात हा प्रकार घडला होता. सोनू निगम विमानात असल्याचे पाहून काही सहप्रवाशांनी त्याला गाण्याची विनंती केली होती. त्यामुळे विमानातील उद्घोषणा प्रणालीचा वापर करून सोनू गायलाही होता. विमानाच्या चालक दलाच्या सदस्यांनी त्याला उद्घोषणा प्रणालीचा वापर करण्याची मुभा दिली होती. असे करणे नियमबाह्य आहे. उद्घोषणा प्रणालीचाही तो दुरुपयोग आहे. चालत्या विमानात असे करणे नियमाला धरून नाही. तरीही सोनूने ‘दो पल ख्वाबों का कारवां’ आणि ‘पंछी नदियां पवन के झोंके’ ही गाणी गायली.काही सहप्रवाशांनी सोनूच्या या ‘लाइव्ह कॉन्सर्ट’चा व्हिडीओ तयार केला आणि काहीच तासांत तो व्हायरलही झाला.
या संपूर्ण घटनेमुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या भुवया उंचावल्या. जेट एअरनेही या घटनेची गंभीर दखल घेतली आणि संबंधित चालक दलाच्या सदस्यांना निलंबित करण्यात आले.