Odisha Railway Accident : देशभरातील सिग्नल यंत्रणेचं होणार ऑडिट, अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 08:07 AM2023-06-06T08:07:59+5:302023-06-06T08:09:43+5:30
बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वेकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत.
बालासोर रेल्वे अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण यात जखमीही झाले आहेत. या अपघातानंतर आता रेल्वेकडून मोठी पावलं उचलण्यात येत आहेत. सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर, रेल्वे मंत्रालयानं आता देशभरातील सिग्नलिंग सिस्टमचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना आठवडाभरात चौकशी करून १४ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा देशभरात तपास केला जाईल तेव्हा १० टक्के ठिकाणावर वरिष्ठ अधिकारी पुन्हा तपास करतील. याद्वारे सिग्नल यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे का नाही हे तपासलं जाईल. याशिवाय रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या हाऊसिंग सिग्नलिंग उपकरणांचा तपास करण्याचेही आदेश देण्यात आलेत.
रेल्वे अपघातात आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांसाठी 'वीरू'चा मदतीचा हात, केली मोठी घोषणा
याशिवाय, रिले रूमची तपासणी केल्यानंतर, दुहेरी सिग्नलिंग यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे का नाही हे पाहिलं जाईल. सिग्नलिंग सिस्टम रिले रूममधूनच नियंत्रित केली जाते. दुसरीकडे, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघातातील जखमी चालक आणि त्याच्या सहाय्यकांचे जबाब नोंदवले. दोघांवर एम्स-भुवनेश्वरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी रेल्वे कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी १७० जणांची ओळख पटली आहे.
सीबीआय तपासाची मागणी
बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कोण कर्मचारी दोषी आहेत, हे अद्याप निश्चित केलेलं नाही. सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी रेल्वे खात्यानं केली होती. गाड्या कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहिती देणाऱ्या इंटरलॉकिंग यंत्रणेत छेडछाड केली असावी, असा संशय रेल्वेनं व्यक्त केला आहे.
...म्हणून तपास दिला सीबीआयकडे
रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी कोणीतरी छेडछाड केली असावी. त्यामुळेच ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात घडला, असा प्राथमिक तपासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.