हिमालयात मोठा भूकंप होणार, दिल्लीसह उत्तरेकडील शहरे हादरणार : रिसर्च
By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 07:55 PM2020-10-22T19:55:12+5:302020-10-22T20:08:34+5:30
earthquake in the Himalayas News : हिमालय पर्वतरांगांमुळे हजारो वर्षांपासून देशाचे रक्षण होत आले आहे. मात्र आता याच हिमालय पर्वतामध्ये मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली - भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंतच्या सीमेवर पसरलेल्या हिमालय पर्वतरांगांमुळे हजारो वर्षांपासून देशाचे रक्षण होत आले आहे. मात्र आता याच हिमालय पर्वतामध्ये मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता असून, या भूकंपाची तीव्रता ८ किंवा त्यापेक्षा अधिक असू शकते. तसेच हा भूकंप सध्याच्या पिढीच्या हयातीतच येऊ शकतो, अशी भीती संशोधनामधून समोर आली आहे. तसेच अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दाट लोकसंख्या असलेल्या या प्रदेशामध्ये जीवित आणि वित्ताची मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते, असी भीती संशोधकांनी वर्तवली आहे.
येत्या भविष्यात हिमालय पर्वतरांगेत येणारा भूकंप २० व्या शतकात अलेउटियन सबडक्शन झोनमध्ये आलेल्या भूकंपाप्रमाणे असू शकतो. या भूकंपाचा विस्तार अलास्काच्या आखातापासून पूर्व रशियातील कामचटका पर्यंत होता. ऑगस्ट महिन्यात सेस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये भूगर्भीय सिद्धांतांचा वापर करून आधी झालेल्या भूकंपांचे प्रभाव क्षेत्र यांचा अभ्यास करून भविष्यातील भूकंपांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या संशोधनाचे लेखक स्टीव्हन जी वेस्रोस्की यांनी सांगितले की, संपूर्ण हिमालय पर्वतरांग, पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशपासून पश्चिमेकडील पाकिस्तानपर्यंत भूतकाळात मोठे भूकंप झाले आहेत. भूगर्भ विज्ञान आणि भूकंप विज्ञानाचे प्राध्यापक आणि अमेरिकेतील रेनो येथील नेवाडा विद्यापीठाच्या सेंटर फॉर नियोटेक्टोनिक स्टडीजचे संचालक वेस्रोस्की यांनी सांगितले की, या भागात पुन्हा भूकंप येतील. कदाचित पुढील मोठा भूकंप हा आपल्याच जीवनकाळात येऊ शकतो.
दरम्यान भूकंप विज्ञान आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे प्राध्यापक सुप्रियो मित्रा यांनी सांगितले की, हे संशोधन आधी केलेल्या संशोधनांशी मिलते जुळते आहे. या संशोधनानुसार हिमालयामध्ये ८ रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. चंदिगड आणि डेहराडून तसेच नेपाळमधील काठमांडू ही शहरे हिमालयात येणाऱ्या भूकंपाच्या प्रभावक्षेत्राच्या जवळ आहेत. अशा प्रकारच्या भूकंपाच्या कचाट्यात हिमालय आणि दक्षिणेकडील राजधानी दिल्लीसुद्धा येऊ शकते, असेही वेस्रोस्की यांनी सांगितले.