हायड्रोजन कारने गडकरी संसदेत; पेट्रोल, डिझेल आयात कमी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:32 AM2022-03-31T05:32:34+5:302022-03-31T05:33:18+5:30
हायड्रोजन कारने गडकरी संसदेत; पेट्रोल, डिझेल आयात कमी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीने हैराण झालेल्या भारतीयांना दिलासा देणारी हायड्रोजन कार आता लवकरच भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी या गाडीने संसदेपर्यंत प्रवास केला. तेलावर स्वावलंबी होण्यासाठी आम्ही पाण्यापासून तयार होणारे ग्रीन हायड्रोजन इंधन आणले आहे. ही कार पायलट प्रोजेक्ट आहे.
देशात लवकरच ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू होणार आहे. यापुढे अधिक तेल आयातीवर बंदी घातली जाईल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केल्या जातील. इंधनाचे भविष्य हायड्रोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जानेवारीमध्येच गडकरींनी सांगितले होते की, ते लवकरच दिल्लीत हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमध्ये दिसणार आहेत. हायड्रोजन कारमुळे पेट्रोल इंधनाला नवा पर्याय मिळाला आहे.
या कारमुळे स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून लोकांचे आकर्षण वाढले आहे. कारमध्ये प्रगत फ्यूएल सेल लावले असून, ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यातील अभिक्रियेमुळे वीज निर्माण करतात. यात उत्सर्जन होत असताना धूर न निघता केवळ पाणी बाहेर पडते.
कचऱ्यापासून तयार होणार हायड्रोजन
काचेच्या वस्तू आणि प्लास्टिक वेगळे करून सेंद्रिय कचरा बायो-डायजेस्टमध्ये टाकून मिथेन तयार केल्यास त्यापासून ग्रीन हायड्रोजनही तयार होईल. ग्रीन हायड्रोजन हे पाणी किंवा सेंद्रिय कचऱ्यापासून बनवले जाते. भारत सरकारने यासाठी तीन हजार कोटींची तरतूद केली असून, भारत हायड्रोजन निर्यात करणारा देश बनेल.
- नितीन गडकरी,
केंद्रीय मंत्री