नोकराच्या चौकशीतून दिशा मिळेल
By admin | Published: January 10, 2015 12:10 AM2015-01-10T00:10:20+5:302015-01-10T00:10:20+5:30
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती खा. शशी थरूर यांच्या नोकराची एसआयटीने चौकशी केली असून येत्या तीन चार दिवसांत निश्चितपणे ठोस काही निष्पन्न होईल,
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती खा. शशी थरूर यांच्या नोकराची एसआयटीने चौकशी केली असून येत्या तीन चार दिवसांत निश्चितपणे ठोस काही निष्पन्न होईल, असा दावा दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी केला आहे.
विशेष तपास पथकाने(एसआयटी) सध्या या प्रकरणाचा प्रत्येक बाबीच्या अनुषंगाने तपास चालविला आहे. सुनंदांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी थरूर यांच्या नोकराने त्यांची भेट घेतली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता बस्सी म्हणाले की, अनेक बाबी घडणार असून लगेचच तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. आमच्या हाती ठोस काही लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती पुरवू. येत्या तीन ते चार दिवसांत तुम्हाला निश्चित असे काही कळवता येईल. एसआयटीकडून तपास सुरू असताना मला तपासाच्या प्रगतीबाबत नियमित माहिती दिली जाणार आहे, असे ते म्हणाले. पोलीस मुख्यालयाबाहेर त्यांना पत्रकारांनी गाठले होते.
नोकराची काय केली चौकशी...
एसआयटीने गुरुवारी थरूर यांच्या नोकराची चौकशी करताना त्याच्याकडून सुनंदा यांच्या मृत्यूच्या ४८ तास आधीच्या घडामोडींची माहिती घेतली. सुनंदाच्या शरीरावर जखमा होण्यापूर्वीच्या काळात तो कुणाला भेटला आणि त्याने काय केले याचा तपशील मिळविण्याचा या चौकशीत प्रयत्न झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
(लोकमत न्यूज नेटवर्क)
४सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबावाविना आणि पूर्वनिष्पत्तीविना केला जावा, अशी मागणी त्यांचे पती खा.शशी थरूर यांनी केली आहे. थरूर यांनी या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. दिल्ली पोलिसांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांची उत्तरे देण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.