काही दिवसांत पुरेशी रोकड उपलब्ध होईल - वित्त सचिव

By admin | Published: November 14, 2016 12:16 PM2016-11-14T12:16:39+5:302016-11-14T13:26:11+5:30

नोटबंदीमुळे लोकांनी गोंधळून जाण्याचे कारण नसून पुढच्या काही दिवसांत सगळीकडे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे वित्तसचिव शक्तिकांता दास यांनी आज सांगितले.

There will be enough cash available in a few days - Finance Secretary | काही दिवसांत पुरेशी रोकड उपलब्ध होईल - वित्त सचिव

काही दिवसांत पुरेशी रोकड उपलब्ध होईल - वित्त सचिव

Next
नवी दिल्ली, दि. 14 - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सगळीकडे रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँका आणि एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नोटबंदीमुळे लोकांनी गोंधळून जाण्याचे कारण नसून पुढच्या काही दिवसांत सगळीकडे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे वित्तसचिव शक्तिकांता दास यांनी आज सांगितले. 
दिल्ली प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दास यांनी नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी दास म्हणाले, "पुढच्या काही दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटबंदीमुळे गोंधळून, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सध्या रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा प्रमाणावर रोख रक्कम उपलब्ध आहे. मात्र तिच्या वितरणामध्ये अडचणी येत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे."
यावेळी सामान्य नागरिकांच्या सोईसाठी करण्यात येत असलेल्या उपायांचीही माहिती दास यांनी दिली. "बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा आठवड्याला 24 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच साडेचार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. तसेच एटीएममधून अडीच हजार रुपये काढता येतील." मात्र प्रत्येक एटीएममधून अडीच हजार रुपये काढता येणार नाहीत. असेही त्यांनी सांगितले.
 नोटबंदींमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जुन्या नोटा 24 नोव्हेबरपर्यंत स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विमान तिकीट आणि रेल्वे तिकिटांसाठी जुन्या नोटा चालतील, अशी माहिती दास यांनी दिली. नागरिकांपर्यंत रोख रक्कम पोहोचवण्यासाठी सरकारने सर्व पर्यायांचा वापर करण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. "पोस्ट ऑफिसांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील नागरिकांच्या सोईसाठी ग्रामीण भागातील रोख रकमेच्या पुरवठ्यात वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंक विशेष पथकात तयार करेल. तसेच नव्या नोटा देण्यासाठी एटीएमच्या रचनेत करण्यात येत असलेले तांत्रिक बदल पुढच्या काही दिवसांत पूर्ण होतील,"असे दास म्हणाले.  
घरात रोख रक्कम साठवणाऱ्या लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. "अडीअडचणींसाठी भारतातील प्रत्येक कुटुंब स्वत:कडे रोख रक्कम बाळगत असते. त्यामुळे अशा लोकांना गोंधळून जाण्याची गरज नाही. अडीच लाखापर्यंत रोख रक्कम प्रत्येकाला आपल्या खात्यात जमा करता येईल." अशी माहिती त्यांनी दिली. तसेच बॅंकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी वेगळ्या लाइन लावण्याची व्यवस्था करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: There will be enough cash available in a few days - Finance Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.