अधिवेशनात बरेच निर्णय होतील - मोदी
By admin | Published: July 19, 2016 05:54 AM2016-07-19T05:54:12+5:302016-07-19T05:54:12+5:30
संसदेच्या या अधिवेशनात जनहिताचे अनेक निर्णय होतील, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केली.
नवी दिल्ली : संसदेच्या या अधिवेशनात जनहिताचे अनेक निर्णय होतील, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले.
त्या आधी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्धापन दिनाच्या तोंडावर सुरू झालेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन चर्चेद्वारे अनेक प्रश्न सोडवतील.’
अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करून ते म्हणाले की, ‘देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी एकत्र येण्याचा दोन्ही बाजूंचा मूड आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोक खांद्याला खांदा लावून लढले होते. त्यांचे स्मरण करीत आम्ही एकत्र येत देशाच्या प्रगतीच्या दिशेने नेण्याचे आम्ही ठरविले आहे.’
जीएसटीसंबंधीचे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी विरोधकांनी दाखविलेल्या तयारीमुळेच पंतप्रधानांनी इतकी सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अन्य विधेयके मंजूर करून घेण्यासाठी राज्यसभेत सरकारला काँग्रेस व अन्य विरोधकांची गरज लागणार असून, त्यामुळे या वेळी केंद्र सरकारने गोडीगुलाबीने सारे घेण्याचे ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.