कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड नाही - नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 02:26 PM2017-07-27T14:26:18+5:302017-07-27T14:29:56+5:30
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप आणणारे नितीश कुमार यांनी अखेर ट्विटरच्या माध्यमातून आपलं मौन सोडलं आहे
पाटणा, दि. 27 - मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप आणणारे नितीश कुमार यांनी अखेर ट्विटरच्या माध्यमातून आपलं मौन सोडलं आहे. नितीश कुमार यांनी कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड केली जाणार नाही असा पुनरुच्चार केला आहे. तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर झालेल्या खडाजंगीनंतर नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर पुढील 24 तासांत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मान. प्रधानमंत्री की शुभकामना हेतु धन्यवाद.भ्रष्टाचार से समझौता नहीं होगा. मुझे विश्वास है,केंद्र के सहयोग से राज्य में विकास को गति मिलेगी.
— Nitish Kumar (@NitishKumar) July 27, 2017
नितीश कुमार यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड केली जाणार नाही. केंद्राकडून मिळणा-या सहकार्याच्या आधारे बिहार विकासाकडे वाटचाल करेल', असं नितीश कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान याआधी लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली. 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं.
'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
'बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. खरं सांगायचं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याचं आम्हाला माहित होतं. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते', असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 'भारतामधील राजकारणात हीच मोठी समस्या आहे की, सत्तेसाठी व्यक्ती काहीही करतो. कोणताही नियम नाही, विश्वासार्हता नाही', असंही राहुल गांधी बोलले आहेत.