'2019 मधील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध संपुर्ण देश अशी असेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 01:24 PM2017-10-06T13:24:44+5:302017-10-06T13:26:39+5:30
'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांच्यासोबत एकाच मंचावर आले होते. मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पुढील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात संपुर्ण देश अशी होईल असं सांगितलं.
'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांच्याकडे इशारा करत सांगितलं की, 'युद्ध तुमचे नेता, तुमचे वरिष्ठे नेता आणि लोकांमध्ये होणार आहे'. 'विरोधक एकत्र येवो अथवा न येवोत, हे अंकांचं गणित आहे जे राजकारणात गरजेचं आहे. पण जे लोकांमध्ये सुरु आहे ते मी सांगू शकतो. लोक एकवेळचं अन्न त्यागू शकतात, मात्र आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करु शकत नाहीत', असं अरविंद केजरीवाल बोलले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'देशात इतकं भीतीचं वातावरण आहे, ज्याची कल्पना तुम्ही करु शकत नाही. आणि हे मी म्हणत नाही, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधली भीतीच सांगत आहे. ही भीती व्यापारी, व्यवसायिक आणि स्टॉक मार्केटमध्येही आहे. अशा परिस्थिती देश कसा चालेल ? पुढील निवडणूक विरोधक विरुद्ध भाजपा नाही, तर भाजपाविरुद्ध संपुर्ण देश अशी असेल'. पुढे ते बोलले की, 'असं वाटतं संपुर्ण देशावर नजर ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे व्यापारी घाबरले आहेत'. अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांचं कौतुक करताना, त्यांनी कोसळत असलेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्याची हिंमत दाखवली असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला उत्तर देताना यशवंत सिन्हा बोलले की, 'मी भीष्म आहे. द्रोपदीचं वस्त्रहरण होत असताना भीष्म शांत बसले होते. पण मी शांत बसणार नाही. अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही'.