... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 01:23 PM2018-11-27T13:23:54+5:302018-11-27T13:25:38+5:30
वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला साधू-संतांनी विरोध केला आहे. परम धर्म संसंदेतील संतांनी श्रीरामांच्या 221 फुटी पुतळ्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच पुतळ्याऐवजी श्रीराम यांचे मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करा, तेही कुठल्याही जातीय वादाशिवाय, असे धर्मगुरुंनी योगींना सुनावले आहे. त्यामुळे योगींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पास एकप्रकारे घरातून विरोध झाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळीच योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर प्रभू श्रीराम यांची 221 फुटी उंच मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली. तसेच याबाबत उत्तर प्रदेश सरकारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहितीही दिली. त्यानुसार, राम सुतार यांनी साकारलेल्या मूर्तीचीच प्रतिकृतीची निवड या उंच पुतळ्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, आता परम धर्म संसंदेतील संतांनी यास विरोध केला आहे.
वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामध्ये, सध्याची हिंदू संस्कृती, हिंदू संस्कृतीचा प्रचार व प्रसार याबाबत चर्चा केली. तसेच राम मंदिर, गंगा नदीचे शुद्धीकरण आणि सनातन धर्म यांसारख्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. तर, धर्म संसदेच्या दुसऱ्या दिवशी श्रीरामांचा उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दल चर्चा करण्यात आली. त्यास, संसदेतील संतानी विरोध केला आहे. अगोदरच देशात सर्वत्र महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. तर, प्रभू श्रीराम हे त्यांचे दैवत आहे. त्यामुळे देवाचा पुतळा उभारायचा नसतो, तर त्यांचे मंदिर उभारायचे असते, असे म्हणत संतांनी श्रीरामांच्या पुतळ्याला आपला विरोध दर्शवला आहे.