दरमहा चार लाख रुपयांच्या पोटगीचा पतीला कोर्टानं दिला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:41 AM2017-08-28T02:41:35+5:302017-08-28T02:42:16+5:30
घटस्फोटाच्या खटल्यात अति गर्भश्रीमंत पतीने वेगळे राहणा-या पत्नीला दर महिन्याला तब्बल चार लाख रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला.
नवी दिल्ली : घटस्फोटाच्या खटल्यात अति गर्भश्रीमंत पतीने वेगळे राहणा-या पत्नीला दर महिन्याला तब्बल चार लाख रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला.
पत्नीला आणि या जोडप्याच्या एकुलत्या एक मुलीला सोडून दिल्याबद्दल, या पोटगीत दरवर्षी १५ टक्क्यांची वाढ देण्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या खटल्यातील पती हा ‘अति श्रीमंत’ वर्गातील असून, त्याच्या व्यवसायाची निव्वळ किमत एक हजार कोटी रुपये असल्याची नोंद पोटगीची ही रक्कम निश्चित करताना विचारात घेतलेली आहे. प्रधान न्यायाधीश नरोत्तम कौशल यांनी या पतीच्या उत्पन्नाने दोन वर्षांत लक्षणीय उडी घेतली असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे म्हणून विभक्त पत्नी आणि या जोडप्याची मुलगी यांच्यासाठी पोटगीच्या रकमेत दरमहा १५ टक्क्यांची वाढही केली. या कुटुंबाच्या व्यवसायाची श्रेणी ही अति श्रीमंत यादीत असून, त्याच्या कंपन्यांची मालमत्ता ‘फॉर्च्युन ५००’ प्रकाशनाने प्रसिद्ध केल्यानुसार ९२१ कोटी रुपये आहे. हे विचारात घेता, हा पती भारतातील अत्यंत श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील आहे हे दिसते, असे कौशल यांनी म्हटले. शिवाय हा पती त्याच्या वडिलांना एकमेव अपत्य असून, तो त्याच्या वडिलांसोबत राहतो, असे न्यायाधीश म्हणाले.