या 10 ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य ...अन्यथा या योजना, सेवांचे दरवाजे बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:40 AM2017-09-08T01:40:19+5:302017-09-08T01:40:32+5:30
जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे.
नवी दिल्ली : जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे.
आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन कार्डशी लिंक करावे लागेल. आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत वाढवली आहे. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल.
बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य.
५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल.
वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.
ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.
मोबाइल नंबरसाठी ई - केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे.
कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल.
सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे.
गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे.