पॅरासिटामॉलसह या १५६ FDC औषधांवर सरकारने घातली बंदी, दिले असे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:10 PM2024-08-23T14:10:29+5:302024-08-23T14:10:54+5:30
Government Bans These Medicine: आपल्याकडे अनेक घरांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि काही किरकोळ औषधांचा डबा असतो. त्यामध्ये ताप, गॅस, डोकेदुखीसारख्या सामान्य आजारांवरील औषधं गोळ्या यांचा समावेश असतो. तुम्हीही घरी अशी औषधं वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
आपल्याकडे अनेक घरांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि काही किरकोळ औषधांचा डबा असतो. त्यामध्ये ताप, गॅस, डोकेदुखीसारख्या सामान्य आजारांवरील औषधं गोळ्या यांचा समावेश असतो. तुम्हीही घरी अशी औषधं वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्याआरोग्य विभागाने १५६ एफडीसी औषधांवर बंदी घातली आहे. याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून मागच्या बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होतं. दरम्यान, लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही निवडक आणि प्रसिद्ध औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांच्या कॉम्बिनेशनचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.
जी औषधे दोन किंवा अधिक औधषांचं रसायन एका विशिष्ट्य प्रमाणात वापरून तयार केली जातात, त्यांना एफडीसी म्हटलं जातं. सध्या देशामध्ये अशा औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दरम्यान, ताप, सर्दी, अॅलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारांवर उपचार ठरणारी १५६ एफडीसी औषधांवर बंदी घातली आहे. आता मेडिकल स्टोअर्समधून ही औषधे विकता येणार नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषधे प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतात.
केंद्रीय आयोग्य मंत्रालयाने याच महिन्याच्या १२ तारखेला प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार सरकारने फार्मा कंपन्यांकडून वेदनाक्षमक औषधांच्या रूपात वापरण्यात येणाऱ्या एसेक्लोफेनाक ५० एमजी+पॅरासिटामॉल १२५ एमजी टॅबलेटवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत रिपोर्टनुसार सरकारने पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घातली आहे. मल्टीव्हिटॅमिनच्या काही औषधांनाही याच्या चौकटीत आणण्यात आलं आहे. एसिक्लेफेनाक ५० एमजी+पॅरासिटामॉलल १२५ टॅबलेटवरही बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या फार्मा कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या वेदनाक्षामक औषधांमधील हे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे.