.. या निकषांवर मोदींनी केली नव्या मंत्र्यांची निवड
By admin | Published: July 5, 2016 02:28 PM2016-07-05T14:28:24+5:302016-07-05T14:28:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा महत्वाचा विस्तार करताना १९ नव्या चेह-यांना संधी दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा महत्वाचा विस्तार करताना १९ नव्या चेह-यांना संधी दिली.
अनुभव, कुशलता आणि ऊर्जा
मोदींनी विविध क्षेत्रात कामांचा अनुभव असलेल्या खासदारांची नव्या मंत्रिमंडळात निवड केली आहे. ज्यांच्या अनुभवाचा, कुशलतेचा खात्याला आणि पर्यायाने देशाला फायदा होईल. पी.पी.चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयातील वकिलीचा चार दशकांचा अनुभव आहे. त्यांचा घटनात्मक विषयांचा चांगला अभ्यास आहे. महाराष्ट्रातून मंत्री झालेले सुभाष राम राव भामरे प्रख्यात डॉक्टर असून, कर्करोगावरील शस्त्रक्रियेत ते तज्ञ आहेत. एम.जे.अकबर संपादक होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ते नावाजलेले पत्रकार आहेत. या विविध क्षेत्रातील तज्ञ खासदारांच्या अनुभवाचा फायदा व्हावा हा उद्देश आहे. अपना दलच्या अनुप्रिया पटेल आणि मनसुख मानदाविया या तरुण चेह-यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले आहेत. मनसुख यांनी गुजरातमध्ये कृषी क्षेत्रात काम केले आहे.
एकालाच बढती
पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम करणारे महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. जावडेकर वगळता कॅबिनेट स्तरावर कोणताही दुसरा बदल झालेला नाही. काही खातेबदल होऊ शकतात.
शिवसेनेला स्थान नाही
राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही. केंद्रात सरकार आल्यानंतर शिवसेनेला अनंत गिते यांच्या रुपाने अवघे एक मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर १८ खासदार असूनही शिवसेनेला मंत्रिपद मिळालेले नाही.
१९ पैकी १७ मंत्री भाजपचे
राज्यसभेतील आरपीआय खासदार रामदास आठवले आणि अपना दलच्या अनुप्रिया पटेल ही दोन नावे वगळता भाजपने मंत्रिमंडळात आपल्याच पक्षाच्या खासदारांना स्थान दिले आहे. १९ पैकी १७ मंत्री भाजपचे आहेत.
कामगिरीला महत्व
मोदींचा सुशासन आणि विकासाचा दृष्टीकोन जे पुढे नेऊ शकतात अशा खासदारांना प्राधान्य देण्यात आले आहे. कृतीला कार्याची जोड देणा-यांची मंत्रिमंडळात निवड करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेश निवडणूक
उत्तरप्रदेशात पुढच्यावर्षी होणारी विधानसभा निवडणूक आणि जातीय समीकरणे लक्षात घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशातून तीन जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
संघटनात्मक फेरबदल
मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलही होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.
अमित शहांची घेतली होती भेट
ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली त्या सर्वांनी सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती.
या राज्यातले मंत्री
मंत्रिमंडळ विस्तारात राजस्थानातून चार खासदार, उत्तप्रदेश, गुजरात आणि मध्यप्रदेशातून प्रत्येकी तीन, महाराष्ट्रातून दोघा खासदारांना संधी देण्यात आली आहे.