‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:57 PM2024-09-28T13:57:45+5:302024-09-28T14:01:54+5:30
Vande Bharat Train: देशातील काही मार्गांसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचा दावा केला जात असला तरी परदेशातून वंदे भारत ट्रेनला मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते.
Vande Bharat Train: देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. यातच वंदे मेट्रोची पहिली ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली असून, वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता परदेशात वंदे भारतचा डंका वाजत असून, तीन देशांनी वंदे भारत ट्रेनमध्ये रस दाखवला आहे. तसेच भारताकडून वंदे भारत ट्रेन आयात करण्याची तयारी दर्शवली आहे.
भारतातून काही देशांसाठी डबे, ट्रेनसेट निर्यात केले जातात. अनेक देश भारताकडून रेल्वेसंबंधीच्या अनेक गोष्टी आयात करत असतात. याचे उत्तम उदारहण म्हणजे श्रीलंका आणि बांग्लादेश. मात्र, वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काम सुरू असतानाच परदेशातील अनेक देश वंदे भारत ट्रेनचे फॅन असल्याची माहिती समोर आली होती. तसेच लवकरच वंदे भारत ट्रेन निर्यात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या देशांकडून वंदे भारतला मोठी मागणी?
परदेशात वंदे भारत ट्रेनची मागणी वाढत आहे. चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यात रस दाखवला आहे. परदेशात वंदे भारत ट्रेनचे आकर्षण असण्यामागे अनेक कारणे असल्याचे म्हटले जात आहे. खर्च हा यातील एक प्रमुख घटक आहे. इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या ट्रेनच्या निर्मितीचा खर्च सुमारे १६० ते १८० कोटी रुपयांच्या घरात जातो. मात्र, वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे १२० चे १३० कोटी रुपये लागतात, असे सांगितले जाते.
ट्रेनमध्ये घेता येतो विमानासारखा फील
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा वेग हाही घटक महत्त्वाचा आहे. सूत्रांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनला ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी फक्त ५२ सेकंद लागतात. हा आकडा जपानच्या बुलेट ट्रेनपेक्षाही चांगला आहे, ज्याला ० ते १०० किमी प्रतितास वेग येण्यासाठी ५४ सेकंद लागतात. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संरचना लोकांना खूप आवडते. वंदे भारत ट्रेनमध्ये विमान प्रवासासारख फील घेता येतो आणि ट्रेनमध्ये येणारा बाहेरचा आवाजही नगण्य असतो.
वंदे भारत ट्रेनचा होणार विस्तार
भारतीय रेल्वे ट्रॅक नेटवर्क वेगाने विस्तारत आहे. तसेच वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचे काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, गेल्या १० वर्षांत ३१ हजार किमीहून अधिक ट्रॅक जोडण्यात आले आहेत. ४० हजार किमची अतिरिक्त ट्रॅक जोडण्याचे आमचे लक्ष्य आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. कवच यंत्रणेच्या विस्तारावरही भर दिला जात आहे. हजारो लोकोमोटिव्हमध्ये कवच यंत्रणा बसवली जाणार आहे.