हवाई दलातील हे काश्मिरी अधिकारी राफेल विमाने भारतात आणण्यात बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 03:48 PM2020-07-28T15:48:23+5:302020-07-28T15:50:15+5:30
राफेल लढाऊ विमानांना भारतात आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेले हवाई दलातील अधिकारी हिलाल अहमद रथर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
नवी दिल्ली - अनेक वर्षांची प्रतीक्षा मधल्या काळात झालेले काही वादविवाद यानंतर अखेर राफेल लढाऊ विमानं भारतात येण्यासाठी सज्ज झाली आहेत. फ्रान्समधून रवाना झालेली राफेल विमाने बुधवारी अंबाला येथील हवाई तळावर पोहोचणार आहेत. फ्रान्ससोबत झालेल्या या विमानखरेदी करारामध्ये अनेक अडथळे होते. कारण ही विमाने भारताच्या सोईप्रमाणे तयार करवून घ्यायची होती. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेले हवाई दलातील अधिकारी हिलाल अहमद रथर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हिलाल अहमद हे सध्या फ्रान्समध्ये असून, भारतीय हवाई दलाचे एअर अॅटॅच म्हणून काम पाहत आहेत. म्हणजेच ते फ्रान्समध्ये भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. तसेच अहमद यांना फ्रान्समधील भारतीय राजदुतांसोबत नेहमीच पाहिले जाते.
हिलाल अहमद हे काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बख्शियारबाद परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण सैनिकी शाळेत झाले होते. त्यानंतर १९८८ मध्ये ते हवाई दलात दाखल झाले होते. त्यांना आपल्या कारकिर्दीची सुरुवात फ्लाइट लेफ्टनंट पदावरून केली होती.
दरम्यान, राफेल विमानांची योग्य वेळी डिलिव्हरी, भारताच्या गरजांनुसार विमानांची रचना करून घेणे आदींची जबाबदारी हिलाल अहमद यांच्यावरच होती. त्यांनी ही जाबबदारी योग्य पद्धतीन पार पाडली. हिलाल यांना एनडीएमध्ये स्वॉर्ड ऑफ ऑनर हा खिताबही मिळालेला आहे.
त्यांच्या कारकिर्दीवर नजर मारल्यास त्यांनी आतापर्यंत मिग - २१, मिराज -२००० आणि किरण या विमानांमधून तब्बल ३ हजारहून अधिक तास उड्डाण केलेले आहे. त्यांना वायुसेना पदकाने गौरवण्यात आले आहे. त्याशिवाय २०१६ मध्ये ग्रुप कॅप्टन असताना त्यांना विशिष्ट्य सेवा मे़डलने गौरवण्यात आले होते.
भारताला बुधवारी पहिली पाच राफेल विमाने मिळणार आहेत. ही विमाने उद्या अंबाला येथील हवाई तळावर दाखल होतील. तर उर्वरित विमाने २०२१ च्या अखेरीपर्यंत सर्व ३६ विमाने भारताला मिळतील. दरम्यान, भारतीय हवाई दलातील अनेक अधिकारी गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये राफेल विमाने उडवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.