देशातील सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वेवर 'या' खास सुविधा मिळणार, पहिला टप्पा 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:48 AM2023-02-08T11:48:18+5:302023-02-08T11:49:26+5:30
largest expressway of india : एक्स्प्रेस वेवर प्रत्येक किलोमीटरवर हाय क्वालिटीची (PTZ) कॅमेरा सिस्टिम बसवली आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा पहिला टप्पा दिल्ली ते दौसा 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. दिल्ली ते दौसा हा टप्पा लालसोटपर्यंत (बड का पाडा) 228 किमी असणार आहे. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी डौला इंटरचेंज येथे 3 अतिरिक्त हेलिपॅड बांधले जात आहेत. त्यानंतर एक्स्प्रेस वे सुरू होताच जयपूर-दिल्ली प्रवास 3 तासांत होईल. सध्या लोकांना साडेपाच ते सहा तास लागतात.
मनी-9 च्या रिपोर्टनुसार, जयपूर ते दौसा इंटरचेंजला एक तास लागेल, तर दौसाहून एक्स्प्रेस वेवर आल्यानंतर दिल्लीचा प्रवास सुमारे अडीच तासांत पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेवर खासगी वाहनांचा कमाल स्पीड 120 किमी आहे. एनएचएआय (NHAI) हा एक्स्प्रेस वे दौसा (द्वारपुरा श्याम सिंग पुरा चॅनेज 168-550) पासून 10 किमी पुढे थेट जयपूर रिंग रोड आग्रा रोडला जोडला जाणार आहे.
दरम्यान, प्रत्येक 50 किमी अंतरावर रेस्ट एरिया देण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांसाठी आणि अपघाताच्या स्थितीत अत्याधुनिक फिडिंग एरिया देखील आहेत. पार्क ट्रॉमा सेंटरमध्ये खेळण्यासाठी स्वतंत्र पुरुष आणि महिला वॉर्ड आहेत. प्रत्येक 8 ते 10 खाटांच्या वॉर्डात 3-3 एसी आहेत. स्वच्छतेसाठी 24 तास सफाई कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. एक्स्प्रेस वेवर प्रत्येक किलोमीटरवर हाय क्वालिटीची (PTZ) कॅमेरा सिस्टिम बसवली आहे. कॅमेरा 360 डिग्री मूव्हमेंट करताना प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवेल.
'या' गोष्टी महत्त्वाच्या...
- अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास कॅमेरा कंट्रोल रूममध्ये अलर्ट देण्यात येईल. त्यानंतर तात्काळ रिप्सान्स टीम पोहोचेल.
- एक्स्प्रेस वेवर वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ती रस्त्यावर येते, तेव्हा बजर वाजेल.
- खराब हवामान, धुके जाम किंवा वळवण्याच्या बाबतीत एक्स्प्रेस वेच्या मोठ्या स्क्रीनवर मेसेज दिसून येतील.
- अशा स्थितीसाठी प्रत्येक 50 किमी अंतरावर रेस्ट एरिया देण्यात आली आहे.
- वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलन कापले जाईल आणि चलनचा मेसेज तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल.
इंटरचेंजवर कापला जाईल टोल
सोहना (दिल्ली) प्रकल्प संचालक मुदित गर्ग यांचे म्हणणे आहे की, या एक्स्प्रेस वेवर प्रति किमी 2.20 रुपये टोल आकारला जाईल. मात्र या एक्स्प्रेस वेवर कोणताही टोलनाका असणार नाही. तुम्ही ज्या इंटरचेंजमध्ये उतराल तेथे किमीनुसार टोल वसूल केला जाईल. या एक्स्प्रेस वेवर वाहन चालवणे सोपे व्हावे, यासाठी एक्स्प्रेस वेच्याच चढ-उतारांवर टोलनाके उभारण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना जास्त त्रास होणार नाही.