आईसाठी त्या दोघींनी खोदली विहीर
By admin | Published: June 6, 2017 04:46 AM2017-06-06T04:46:46+5:302017-06-06T04:46:46+5:30
दोन बहिणींनी घराजवळच विहीर खोदण्याचे ठरविले
कोरिया : पिण्यासाठी घराजवळ पाणी नाही म्हणून त्यांची आई दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणायची. आईचे हे कष्ट त्यांना पाहवले नाही. म्हणून या दोन बहिणींनी घराजवळच विहीर खोदण्याचे ठरविले. छत्तीसगढच्या कोरिया जिल्ह्यातील या मुलींचे साहस ऐकून कुणालाही अभिमान वाटेल. कसहियापारामध्ये अमरसिंह गोंड आणि त्यांच्या पत्नी जुकुमल हे आपल्या दोन मुली शांती आणि विज्ञांती यांच्यासोबत राहतात. या परिसरासाठी तीन हातपंप आहेत. पण, यातील दोन खराब झाले आहेत आणि एकाचे पाणी दूषित आहे. त्यामुळे लोकांना दूरवरून पाणी आणावे लागते. जेव्हा या दोन बहिणींनी विहीर खोदण्याचे ठरविले तेव्हा अनेकांनी त्यांची थट्टा केली. प्रत्यक्ष विहीर खोदण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. नशिबानेही साथ दिली आणि अवघ्या २० फुटांवरच पाणी लागले. कष्टाचे चीज झाल्याचा आनंद या बहिणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.