त्या सर्वांची चांगल्या आयुष्याची स्वप्ने भंगली!
By admin | Published: October 2, 2016 12:38 AM2016-10-02T00:38:44+5:302016-10-02T00:38:44+5:30
घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने
नवी दिल्ली : घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने बिहारमधील ४0 जण आपल्या कुटुंबियांना सोडून सौदी अरबमध्ये रोजगारासाठी गेले खरे: पण त्यांना तिथून अक्षरश: रिकाम्या हातानेच यावे लागले आहे. ही कहाणी केवळ भारतातील कामगारांची नाही. पाकिस्तान, बांगला देश आणि फिलिपाइन्समधील मजुरांचीही हीच स्थिती झाली.
भारतातील कामगार तिथे रोजगारासाठी गेले, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे त्यांना केवळ रोजगारच मिळाला असे नाही, तर हातात पैसाही बऱ्यापैकी खुळखुळू लागला. त्यामुळे ते आनंदात होते. काही महिने त्यांनी बऱ्यापैकी रकमा भारतातील कुटुंबियांना पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या भारतातील नातेवाईकांमध्येही खुशीचे वातावरण होते. कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा दीर, कोणाचा भाउ असे बिहारमधील किमान ४0 जण याप्रकारे मस्त मजेत जगत होते.
लेबनानचे माजी पंतप्रधान आणि कोट्यधीश असलेले साद हरीरी यांच्या तेल कंपनीत त्यांना रोजगार मिळाला होता. तिथे ५0 हजार कामगार काम करीत होते. पण अचानक तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरू झाली. घसरणही इतकी मोठी की व्यवस्थापनाने तेथील कँटीन बंद करून टाकले. त्यामुळे जेवण मिळेनासे झाले. मग प्यायला पाणीही मिळेना. वीजपुरवठाही थांबवण्यात आला. रोजगारही गेलाच. अनेकांना महिन्याचा पगारही मिळाला नाही.
त्यातच परत येण्यासाठी पैसा नाही. काहींच्या हातात थोडे पैसे होते. पण त्यांचे पासपोर्ट, वर्किंग व्हिासाची कागदपत्रे एक तर कंपन्या, व्यवस्थापन वा दलाल यांनी त्यांच्याकडून काढून घेतले होते. त्यामुळे भारतात परतणेही शक्य नव्हते.
माझ्या मालकाने माझ्या कागदपत्रांचे नुतनीकरणच केले नव्हते. त्यामुळे मला अटक करण्यात आली... २७ वर्षांच्या हुसेन सांगत होता. तो सौदी राजाच्या रियाधमधील राजवाड्याच्या नुतनीकरणात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. अर्थात कंत्राटी कामगार म्हणून. तेथील नियमाप्रमाणे त्याला दुसरे काम शोधायची संमती नव्हती. संतोष या बांधकाम मजुराचीही हीच स्थिती होती. पगारही इथे सांगितला, त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी दिला गेला. सिवान जिल्ह्यातील झाकीर हुसेन म्हणाला की, आमच्या गावात दवंडी पिटून नोकरीसाठी नेण्यात आले. दरमहा ३0 हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले गेले. पण माझी आताची स्थिती पाहा.
मला डिसेंबरपासून पगारच मिळाला नाही. भारत सरकारने आम्हाला इथे आणले, म्हणून दिल्लीपर्यंत तरी आम्ही पोहोचलो. आमच्यापैकी एकाच्याही खिशात दमडी नाही. सरकारच्या खर्चानेच आता येथून घरी जाणार आहोत. रेल्वेची वाट पाहतोय आम्ही सारे...हुसेन म्हणाला. बाकीच्यांनी त्याच्या म्हणण्यावर नुसती मान डोलावली. त्या सर्र्वाची अवस्था अशीच होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)