त्यांना आता मात्र घर गमवायचे नाही
By admin | Published: October 2, 2016 12:43 AM2016-10-02T00:43:36+5:302016-10-02T00:43:36+5:30
अस्वस्थ पाकिस्तानी लष्कर सीमांवर गेल्या १३ वर्षे युद्धबंदी तोडण्यास उतावीळ आहे. पाकने एकाचवेळी अनेक भागांत गोळीबार सुरूही केला आहे. त्याला प्रतिउत्तर दिले जात आहे.
- सुरेश डुग्गर, श्रीनगर
अस्वस्थ पाकिस्तानी लष्कर सीमांवर गेल्या १३ वर्षे युद्धबंदी तोडण्यास उतावीळ आहे. पाकने एकाचवेळी अनेक भागांत गोळीबार सुरूही केला आहे. त्याला प्रतिउत्तर दिले जात आहे. तरीही लोकांत भीती व दहशत आहे.
सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकने राजौरी व पूंछच्या बलनोई, नौशहरा, कृष्णा घाटी, साब्जिया, अखनूरच्या पल्लांवाला व परगवाल भागांत चौक्यांवर गोळीबार केला आहे. त्याआधी भिंबर गली, नौगाव, लिपा व्हॅली, हॉट स्प्रिंग आणि केलमध्येही युद्धबंदीला धुडकावून तोफांचा मारा केला .भारतीय लष्कर त्या हल्ल्यांना उत्तर देत आहे. जिथे पाकने मोर्चेबंदी केली आहे तेथून अजून लोक निघून गेलेले नाहीत. नियंत्रण रेषेच्या भागांत दहा किलोमीटर क्षेत्र रिकामे करण्याचा आदेश अजून दिला गेलेला नाही.
२६४ किलोमीटर लांबीची ही आंतरराष्ट्रीय सीमा आणि ८१४ किलोमीटरच्या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या ३५ लाखांच्या जवळपासचे रहिवासी एकच प्रार्थना करतात की युद्धबंदी तुटून जाऊ नये. कष्टांनी घर उभारले आहे आणि पाकिस्तान ते जमीनदोस्त करायच्या प्रयत्नांत आहे. पूंछच्या दिग्वारचा रहिवासी मुहम्मद अस्लम म्हणतो की माझ्या दोन्ही मुलांचा सीमेवरील गोळीबाराने बळी घेतला. पाकच्या गोळीबारात माझे घर अनेकदा जमीनदोस्त झाले. लष्करी अधिकारी म्हणतात की पाकने हा उद्योग थांबविला नाही तर भारतही उत्तर द्यायला मागे हटणार नाही. सीमा भागांत राहणाऱ्यांना याचीच चिंता आहे. ते १३ वर्षांतील जखमा, वेदना विसरले आहेत. परंतु त्यांना आपला निवारा गमवायचा नाही.
पाक लष्करप्रमुख दु:साहस करतील?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्याआधी ते सीमापार कारवाई करू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. भारतविरोधी कडवा अजेंडा असलेले जनरल शरीफ भारताच्या सीमापार हल्ल्यानंतर शांतपणे घरी परतणार नाहीत, असे भारतीय सुरक्षा संघटनांना वाटते. जनरल शरीफ यांनी दहशतवाद आणि भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांना न जुमानणारे अशी स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. ही प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी ते सीमेपलीकडे कारवाई करू शकतात. जनरल शरीफ सत्ताकांक्षी आहेत. त्यांच्यात आणि पंतप्रधान शरीफ यांच्याच फारसे सख्य नाही. ते दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात.