त्यांना इन्शुरन्स फंडातील ५०-५० लाख मिळाले; शहीद अंशुमन संदर्भात लष्कराची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 08:51 AM2024-07-16T08:51:04+5:302024-07-16T08:56:37+5:30
उत्तर प्रदेश सरकारनेही अंशुमन यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये दिले हाेते. यापैकी आई-वडिलांना १५ लाख, तर पत्नीला ३५ लाख रुपये देण्यात आले हाेते.
नवी दिल्ली : सियाचीन येथे लष्कराच्या छावणीत लागलेल्या आगीच्या घटनेत शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांना आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंडातून १ काेटी रुपये देण्यात आले हाेते. ही रक्कम अंशुमन यांचे आई-वडील आणि पत्नी यांच्यात अर्धी-अर्धी वाटण्यात आली हाेती, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. तसेच अंशुमन यांची पेन्शन त्यांची पत्नी स्मृती यांनाच मिळेल. कारण, त्यांनी नामांकन पत्नीच्या नावे केले हाेते.
उत्तर प्रदेश सरकारनेही अंशुमन यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये दिले हाेते. यापैकी आई-वडिलांना १५ लाख, तर पत्नीला ३५ लाख रुपये देण्यात आले हाेते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंशुमन यांनी पत्नीच्या नावे नामांकन केले हाेते. त्यामुळेच त्यांच्या पत्नीला जास्त फायदे मिळत आहेत. काही राज्यांमध्ये पत्नीला ७० टक्के, तर आई-वडिलांना ३० टक्के रक्कम देण्यात येते.
नियम बदला...
अंशुमन यांच्या आई-वडिलांनी वित्तीय साहाय्यतेच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली.
त्यांनी सांगितले की, ‘कीर्ती चक्र’ला सुनेने हात लावू दिला नाही.
ती सन्मान घेऊन निघून गेली. आमच्याकडे काहीही राहिले नाही. सैन्याने शहीद कुटुंबीयांना मिळणाऱ्या वित्तीय साहाय्याच्या नियमांमध्ये बदल करायला हवे.