‘त्या’ धार्मिक स्थळांवरून फटकारले
By admin | Published: April 20, 2016 03:05 AM2016-04-20T03:05:43+5:302016-04-20T03:05:43+5:30
सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील (फूटपाथ) बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देणारे
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील (फूटपाथ) बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल मंगळवारी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जोरदार फटकारले.
सोबतच हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदतही दिली. याउपरही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी निर्देशांचे पालन केले नाहीतर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना वेळोवेळी व्यक्तिश: सर्वोच्च न्यायालयापुढे हजर होऊन त्यांनी न्यायालयाच्या विविध आदेशांचे पालन का केले नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्तीद्वय व्ही. गोपाल गौडा आणि अरुण मिश्रा यांनी या प्रकरणाची सुनावणी मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तहकूब करताना आम्ही अशाप्रकारची वर्तणूक कदापि सहन करणार नाही,असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)