ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:45 PM2018-11-21T18:45:59+5:302018-11-21T18:47:36+5:30
हल्ल्यानंतर प्रथमच केजरीवाल यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद
नवी दिल्ली : माझ्यावर हल्ले होत नाहीत. तर ते जाणूनबुजून घडवले जात आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काल सचिवालयात केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. यानंतर केजरीवाल यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला.
अरविंद केजरीवाल यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यासाठी आम आदमी पार्टीनं भाजपाला जबाबदार धरलं आहे. 'माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. ही साधीसुधी बाब नाही. हे हल्ले होत नाहीत. तर ते घडवून आणले जात आहेत. या हल्ल्यांसाठी आदेश दिले जात आहेत. आम्ही यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळेच हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत. हे लोक वारंवार आमच्यावर हल्ले करत आहेत,' असा आरोप केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्यावर काल सचिवालयात हल्ला झाला. केजरीवाल त्यांच्या चेंबरमधून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्तीनं बोलता बोलता अचानक केजरीवालांवर मिरचीपूड फेकली. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीचं नाव अनिल असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली.
I've been attacked 4 times in 2 yrs. It's not minor issue.These attacks aren't taking place,they're being ordered.Humlog inki aankhon ka roda ban chuke hain.Yelog milke mujhe marwana chahte hain. Ye baar-baar humlogo ke upar hamle karwa rahe hain: Delhi CM on chilli powder attack pic.twitter.com/vT4BW8Jshg
— ANI (@ANI) November 21, 2018
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ही संपूर्ण घटना म्हणजे ड्रामा असल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे आपकडून ड्रामा सुरू झाला आहे, असा दावा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. निवडणूक जवळ येऊ लागताच केजरीवालांवर हल्ले होऊ लागतात. त्यामुळे यामागचं सत्य समोर यायला हवं, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.