त्यांना शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचा आहे...; पंतप्रधान मोदींचे शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:27 AM2023-08-09T06:27:01+5:302023-08-09T06:27:46+5:30
संजय शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून विरोधक अंतिम चेंडूवर षटकार ...
संजय शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून विरोधक अंतिम चेंडूवर षटकार मारण्याचा विचार करीत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना म्हटले आहे. भाजपने राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर करून सेमीफायनल तर जिंकले आहे. आता अविश्वास प्रस्ताव फेटाळून २०२४ची फायनल जिंकायची आहे, असेही त्यांनी म्हटले.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी यांनी राज्यसभा खासदारांचे अभिनंदन करून म्हटले आहे की, राज्यसभेत काल दिल्ली सेवा विधेयक भाजपने १०१च्या विरोधात १३१च्या जबरदस्त बहुमताने पारित केले. हे म्हणजे सेमीफायनल जिंकण्यासारखे आहे. आता लोकसभेत विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून २०२४ची फायनल जिंकायची आहे. स्वातंत्र्य दिनी देशभरात भाजप खासदारांनी ‘अमृत कलश यात्रा’ काढाव्यात, असे निर्देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
विरोधकांमध्येच अविश्वास
विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीमधील पक्षांना एकमेकांबद्दल अविश्वास आहे.
ते आपल्या सहयोगींच्या विश्वासाची चाचपणी करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव घेऊन आले आहेत.
अविश्वास प्रस्तावाबाबत मला आधीपासूनच माहीत होते. २०१८मध्ये मी म्हणालो होतो की, आपल्याविरुद्ध २०२३मध्ये असा प्रस्ताव आणला जाईल.
विरोधकांचा पुन्हा एकदा घमेंडखोर असा उल्लेख करून मोदी म्हणाले की, सध्या देशातील भ्रष्टाचार, वंशवाद व तुष्टीकरणाचे राजकारण संपवण्याची वेळ आहे.
विरोधी पक्षांचे नेते सामाजिक न्यायाबाबत बोलतात. परंतु वंशवादी, तुष्टीकरण व भ्रष्ट राजकारणाने याचे सर्वाधिक नुकसान केले आहे.