ते उपकार फेडण्याचे प्रयत्न! माजी पंतप्रधान २०२४ मध्ये डाव्यांसोबत जाणार; कर्नाटक निवडणुकीत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:09 PM2023-04-15T13:09:22+5:302023-04-15T13:11:24+5:30
गेल्या काही निवडणुकांचे ट्रेंड पाहता कर्नाटक निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते. गेल्या वेळीही केंद्रात भाजपाचे सरकार आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते.
कर्नाटक विधानसभा निवडणूक ऐन रंगात येत आहे. गेल्या काही निवडणुकांचे ट्रेंड पाहता ही निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते. गेल्या वेळीही केंद्रात भाजपाचे सरकार आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा जनतेने भाजपाला आणि काँग्रेसला बहुमत दिले नाही. परंतू निजदला निर्णायक जागा जिंकवून दिल्या होत्या. यामुळे काँग्रेस आणि निजदने सत्ता स्थापन केली होती. पुढे भाजपाने दोन्ही पक्षांचे आमदार फोडून सत्ता हिसकावली होती. आता देखील भाजपाविरोधात काहीसे वारे असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
या साऱ्या धामधुमीत निजदचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी महत्वाची घोषणा केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डावे पक्ष ज्या गटाला समर्थन देतील किंवा बाजुने उभे राहतील त्यांना जेडीएस समर्थन देईल अशी घोषणा देवेगौडा यांनी केली आहे. देवेगौडा हे अशाप्रकारे डाव्यांचे उपकार फेडण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा कर्नाटकात सुरु झाली आहे.
१९९६ साली एच डी देवेगौडा अचानक देशाचे पंतप्रधान बनले होते. तेव्हा त्यांनी देखील विचार केला नव्हता. वाजपेयी सरकार पडले तेव्हा डाव्या पक्षांचे नेते ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्याची संधी होती. परंतू, आश्चर्यकारकरित्या बसू यांनीच देवेगौडांचे नाव पुढे केले व देवेगौडा पंतप्रधान बनले. यामुळे आता जेव्हा निजद डाव्यांसोबत जाणार असल्याचे वक्तव्य आले तेव्हा देवेगौडा तेव्हाचे उपकार फेडण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. यामुळे विरोधी पक्ष भाजपाविरोधात मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव सक्रीय आहेत. आता कोणाला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करायचे, जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर सारे अवलंबून आहे.