सत्तेत आल्यास राम मंदिरावर 'ते' बुलडोझर चालवतील...; 'इंडिया' आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:23 PM2024-05-18T12:23:26+5:302024-05-18T12:23:40+5:30
सलग दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जागांसाठी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतला.
हमीरपूर / बाराबंकी/ फतेहपूर : केंद्रात सपा-काँग्रेसची सत्ता आल्यास ते रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवतील आणि मंदिरावर बुलडोझर चालवतील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया' आघाडीवर केली.
सलग दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जागांसाठी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतला. यावेळी नरेंद्र मोदींनी राज्यातील त्यांचे विरोधक असलेल्या समाजवादी आणि काँग्रेसवर जोरदार घणाघात सुरूच ठेवला आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला लक्ष्य करताना पंतप्रधानांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान म्हणाले की, 'सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने रामनवमीच्या दिवशी म्हटले होते की, राम मंदिर निरूपयोगी आहे. त्याचवेळी काँग्रेस राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या तयारीत आहे. ते राम मंदिरावर बुलडोझर चालवितील. त्यांच्यासाठी फक्त त्यांचे कुटुंब आणि सत्ता महत्त्वाची आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, बुलडोझरचा योग्य वापर कसा करावा, हे आमच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून शिका, असे पंतप्रधान म्हणाले.
'व्होट जिहाद' करणाऱ्यांना तुमची मालमत्ता देतील...
पंतप्रधान मोदींनी हमीरपूर येथील सभेत सपा व काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, 'ते निवडणुकीत तुमची मते घेतील, पण सत्तेत आल्यानंतर त्यांच्यासाठी 'व्होट जिहाद' करणाऱ्यांना तुमची मालमत्ता वाटून टाकतील. काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस म्हणत आहे की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पण या धमकी देणाऱ्यांना हे माहीत नाही की, ते राखण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नाहीत. ते म्हणतात की त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे आहेत. आम्ही बुंदेलखंडमध्ये जो संरक्षण कॉरिडॉर बनवत आहोत, तो फटाके बनविण्यासाठी नाही, क्षेपणास्त्रे बन- विण्यासाठी आहे,' असे मोदी म्हणाले.