"मला 1 रुपयाही मिळू शकला नाही"; बँकेत चोरी करण्यात अपयशी ठरला चोर, जाता जाता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:05 AM2023-09-03T11:05:22+5:302023-09-03T11:06:32+5:30
चोराने चोरी करण्यात अपयशी झाल्यानंतर बँकेसाठी मेसेज ठेवला. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे.
बँकांमध्ये चोरी होणं ही काही नवीन गोष्ट नाही, कधी चोरी यशस्वी होते तर कधी अयशस्वी. पण तुम्ही अशी घटना क्वचितच ऐकली असेल, ज्यामध्ये चोराने चोरी करण्यात अपयशी झाल्यानंतर बँकेसाठी मेसेज ठेवला. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यात बँकेच्या शाखेत दरोडा घालण्यात अयशस्वी झालेल्या चोराने सुरक्षा उपायांचे कौतुक करणारा एक मेसेज लिहिला.
चोराने त्याला न शोधण्याचे आवाहनही केले. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखवटा घातलेल्या चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून नेनेल मंडळ मुख्यालयात असलेल्या सरकारी ग्रामीण बँकेच्या शाखेत प्रवेश केला. चोरट्याने कॅशियर आणि क्लार्क यांच्या केबिनची झडती घेतली पण चलन किंवा मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत, असं सांगितलं.
बँकेचे लॉकर उघडण्यात चोर अपयशी ठरला. मग त्याने एक वर्तमानपत्र घेतलं आणि त्यावर मार्कर पेनने "मला एक रुपयाही मिळू शकला नाही... त्यामुळे मला पकडू नका. माझ्या बोटांचे ठसे तेथे नसतील. ती चांगली बँक आहे" असं लिहिलं आहे. निवासी इमारतीत बँक सुरू असून तेथे सुरक्षारक्षक नसल्याचं सांगितलं.
शुक्रवारी चोरीचा प्रयत्न झाल्याचे पाहिल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली आणि त्याआधारे भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.