चोरट्यांनी चक्क ट्रांसफॉर्मर पळवला; संपूर्ण गाव 25 दिवसांपासून अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:11 IST2025-01-08T21:10:37+5:302025-01-08T21:11:11+5:30
ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी चक्क ट्रांसफॉर्मर पळवला; संपूर्ण गाव 25 दिवसांपासून अंधारात
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील सोर्हा गावात मागील 25 दिवसांपासून वीज आलेली नाही. याचे कारण म्हणजे, चोरट्यांनी चक्क गावातील 250 KVA चा ट्रांसफॉर्मर चोरुन नेला. ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने 14 डिसेंबरपासून गावकरी वीजेविना जगत आहेत.
5 हजार लोक अंधारात
चोरीची माहिती मिळताच पोलीस व विद्युत विभागाने तपास सुरू केला, मात्र 25 दिवस उलटले, तरी गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला नाही. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव 25 दिवसांपासून अंधारात बुडाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असून, आता वीज नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत
वीज नसल्याचा सर्वाधिक फटका फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. विजेशिवाय विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करता येत नसल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गावप्रमुख सतपाल सिंह म्हणाले, वीज नसल्यामुळे मुलांचे शिक्षण आणि गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. इन्व्हर्टर आणि मोबाइल चार्जिंगसारख्या मूलभूत गरजाही उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. उघैती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अशोक कुमार म्हणाले, ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल.