मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:53 AM2023-02-28T10:53:06+5:302023-02-28T10:53:54+5:30
2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते.
देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. साधारणपणे 15 वर्षांपूर्वी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी त्याला नदीपात्रात सोडले होते. मात्र तो रविवारी जिवंत परतला. ही घटना भागलपूरमधील मुरासन गावात घडली आहे. येथे 2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते. पण मुलगा जिवंत परतल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसले. ते देवाचे आभार मानत आहेत.
मुलाला झाला होता सर्पदंश -
देवरिया जिल्ह्यातील भागलपूरमधील मुरासोन गावचे रहिवासी असलेले राम सुमेर यादव यांचा मुलगा अंगेश याला 2008 मध्ये सर्पदंश झाला होता. त्या वेळी तो केवळ 10 वर्षांचा होता. अंगेशला सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर गावाकडील उपचारही केले. मात्र त्याला कसल्याही प्रकारचा आराम मिळाला नाही. यानंतर त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचारही करून घेण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सर्व बाजूंनी निराशाच आल्यानंतर, लोकांच्या सांगण्यावरून रामसुमेर यांनी अंगेशला केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडून दिले होते.
गारुडी समाज्याच्या वस्ती राहिला -
१५ वर्षांनंतर घरी पोहोचलेल्या अंगेशने सांगितल्यानुसार, तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा गारुडी समाजाच्या वस्तीत होता. त्याने तेथे विचारपूस केली असता अमन माळी नावाच्या एका सापाचा खेळ करणाऱ्याने त्याला नदीबाहेर काढून त्याच्यावर काही उपचार केल्याचे समजले. यानंतर तो अमन माळीसोबतच राहू लागला. अमन माळी शेजार-पाजारच्या खेड्यांत जाऊन सापाचे खेळ दाखवत असे. अंगेशही त्याच्यासोबत जाऊ लागला. काही दिवस अमन माळीसोबत कटिहारमध्ये राहिल्यानंतर, अमनने त्याला अमृतसर येथील एका मोठ्या शेतकऱ्याकडे कामावर ठेवले. तेथून मिळणारा पगार अमन माळी घेत असे.
ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने पोहोचला घरी -
अंगेशने दिलेल्या माहितीनुसार, गेल्याकाही दिवसांपासून अमन माळी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र हळूहळू त्याला त्याचे कुटुंब आणि संपूर्ण भूतकाळ आठवला होता आणि त्याला लवकरच घरी पोहोचायचे होते. गेल्या आठवडाभरापूर्वी त्याने आझमगड जिल्ह्यातील एका ट्रक ड्रायव्हरला आपली संपूर्ण कहाणी सांगितली. यावर ट्रकचालकाने त्याला आझमगडला पोहोचवले. तो येथून ट्रकनेच बलिया जिल्ह्यातील बेलथरा येथे पोहोचला. यानंतर याच जिल्ह्यातील मणियार पोलिस ठाण्यात गेला. मणियार पोलिसांनी अंगेशचे म्हणणे ऐकून घेत त्याला पोलीस ठाण्यात बसवले आणि त्याचा फोटो व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने गावातील सर्पंचाला पाठवला.
कुटुंबीयांनी मानले देवाचे आभार -
मुलाची माहिती मिळताच अंगेशचे कुटुंबीय मणियार पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे अंगेशने आई कमलावती देवी आणि काकू संभलवती देवी यांना पाहताच ओळखले. यनंतर अंगेश त्याच्या घरी गेला. जवळपास 15 वर्षांनंतर अंगेश घरी परतल्याचे पाहून त्याच्या दारात लोकांची गर्दी होऊ लागली.
हा संपूर्म दैवी चमत्कार असल्याचे मानत लोक देवाचे आभार मानत आहेत. अंगेशने सांगितले की, तो आता सर्वांना ओळखू लागला आहे, त्याला हळू हळू सर्व घटना आठवत आहेत. अंगेशची आई कमलावती यांनी सांगितले की, तो त्याच्या बालपणीच्या मित्रांना आणि शिक्षकांनाही ओळखू लागला आहे.