Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 07:01 IST2021-08-31T06:56:48+5:302021-08-31T07:01:45+5:30
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो.

Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला
-हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक कार्यगटाचे मत असून ते केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो. मात्र त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू होण्याचा किंवा प्रकृती खूप गंभीर होण्याचा प्रकार टाळता येतो. कोरोना साथीबरील उपचारांबाबत धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारने हा कार्यगट स्थापन केला आहे. या कार्यगटाने केंद्र सरकारला कळविले आहे की, कोरोना लस घेतलेल्यांना तिसरा बूस्टर डोस द्यावा, असे मत जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य महत्त्वाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेले नाही. अमेरिका, ब्रिटनमध्ये तिसरा बूस्टर डोस देण्यात आला पण त्याचे काही खास परिणाम दिसून आले नाहीत.
जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संचालक व कोरोना कार्यगटाचे सदस्य डॉ. राकेश अग्रवाल यांनी सांगितले की, नजीकच्या काळात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. या एकाच उपायाने मृत्यू व रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल. पुन्हा कोरोना झालेल्यांपैकी ज्यांना एकाहून अधिक व्याधी नाहीत अशा लोकांच्या जीवाला तुलनेने कमी धोका असतो. अशा रुग्णांचा मृत्यू होणे किंवा त्यांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करावे लागण्याची पाळी येण्याची शक्यता नसते.