गुजरातवर तिसरे संकट: प्रचंड पाऊस, महापुरानंतर ‘असना’ चक्रवादळ घोंघावतेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 11:13 AM2024-08-31T11:13:05+5:302024-08-31T11:13:24+5:30

गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर आगामी दोन दिवस ६५ ते ७५ प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

Third crisis over Gujarat Cyclone Asana threat after heavy rains and deluge | गुजरातवर तिसरे संकट: प्रचंड पाऊस, महापुरानंतर ‘असना’ चक्रवादळ घोंघावतेय!

गुजरातवर तिसरे संकट: प्रचंड पाऊस, महापुरानंतर ‘असना’ चक्रवादळ घोंघावतेय!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पाऊस आणि पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या गुजरातवर तिसरे संकट ‘असना’ चक्रीवादळाच्या रूपाने घोंघावत आहे. कधी नव्हे ते तब्बल ४८ वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असून ते १२ तासांत गुजरातच्या तटावर पोहोचू शकते. त्यामुळे कच्छ आणि सौराष्ट्रात जाेरदार पावसाची शक्यता असून यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. कच्छमध्ये झोपड्यांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

चक्रीवादळ ओमान किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे. गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर आगामी दोन दिवस ६५ ते ७५ प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनासमुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुराचा वेढा कायम
गुजरातमधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराच्या पाण्यामुळे अनेक खेडी, वाड्या-तांड्यांना पाण्याचा विळखा कायम आहे. राज्यात मागील २४ तासांत फक्त चार ठिकाणी १५ ते २६ मिमी पाऊस झाला, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कच्छ जिल्ह्यातील मांडवी, भुज, अंजार, नखटराना या भागांना पाण्याने वेढले आहे. विश्वामित्री नदी आता २३.१६ फुटांवरून वाहत आहे.

आवाहन काय?
- गुजरातच्या कच्छ भागात बनलेले दबाव क्षेत्र शुक्रवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. 
- त्यामुळे झोपड्या आणि तात्पुरत्या निवाऱ्यात राहणाऱ्यांना शाळा,  मंदिरे आणि इतर इमारतींत आश्रय घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

१९७६ नंतर प्रथमच ऑगस्टमध्ये चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले आहे.
१९८१  ते २०२३ दरम्यान ऑगस्टमध्ये केवळ तीन चक्रीवादळे आली आहेत.
१९७६  चक्रीवादळ ओडिशात तयार झाले आणि अरबी समुद्रात दाखल झाले.
१९४४ च्या चक्रीवादळाने उग्र रूप धारण केले होते.  
१९६४ गुजरात किनाऱ्याजवळ चक्रीवादळ आले होते.

टोक्योत पूर परिस्थिती 
- जपान : जपानच्या बहुतांश भागात आलेल्या उष्ण कटिबंधीय वादळाचा परिणाम म्हणून टोक्यो आणि परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते, नद्यांच्या  किनाऱ्यावरील भाग जलमय झाले. 
- टोक्योच्या पश्चिम भागातील कानागावा प्रांतात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. टोक्यो, कानागावा आणि शिजुओका  प्रांतात जोरदार पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

एकाच कुटुंबातील १२ ठार
उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये शुक्रवारी जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन एक घर त्याखाली गाडले गेले. त्यात ९ मुलांसह एकाच कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू झाला. ही घटना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर दीर जिल्ह्यात झाली. 
सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत दोन महिला, एक पुरुष आणि ९ मुलांचा मृत्यू झाला. येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Third crisis over Gujarat Cyclone Asana threat after heavy rains and deluge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.