तिसऱ्या आघाडीची चर्चा, के. चंद्रशेखर राव यांनी घेतली देवेगौडांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 02:53 PM2018-04-13T14:53:17+5:302018-04-13T14:53:17+5:30
2019 साली भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे यासाठी राव प्रयत्न करत आहेत.
बंगळुरु- राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेले आणि आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळावा यासाठी तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडूंनी भाजपाविरोधात मोर्चा उघडल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. राव यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची बंगळुरु येथे भेट घेतली. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव एका राष्ट्रीय आघाडीसाठी फार पूर्वीपासूनच प्रयत्नशील होते. बंगळुरुच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गेलेल्या राव यांनी देवेगौडा यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना सुरुवात केली. 2019 साली भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे यासाठी राव प्रयत्न करत आहेत. एच.डी देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांचीही राव भेट घेणार आहेत.
मागील महिन्यामध्ये राव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. 3 मार्च रोजी राव यांनी आता लोकांना तिसऱ्या आघाडीची गरज आहे, असे विधान केले होते. लोकशाहीच्या गेल्या 70 वर्षांच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा गुणात्मक बदल लोकांना दिसलेला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आपल्या समविचारी पक्षांशी आपली चर्चा सुरु असल्याचे त्यांनी मान्य केले.