'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 05:19 AM2019-09-28T05:19:41+5:302019-09-28T06:54:40+5:30
पर्रिकरांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचं निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून कौतुक
पुणे: उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवली. त्यामुळेच सैन्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करता आला, असं मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास अशा प्रकारच्या धाडसी मोहिमा पूर्ण केल्या जाऊ शकतात. येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो, असं ते पुढे म्हणाले. उरी हल्ल्याचा बदला म्हणून २९ सप्टेंबरला भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यावर निंभोरकर यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाष्य केलं.
मनोहर पर्रिकर आणखी ४-५ वर्षे संरक्षणमंत्री राहिले असते, तर देशाच्या संरक्षण विभागाचं सामर्थ्य आणखी वाढलं असतं, असं निंभोरकर म्हणाले. 'पर्रिकर यांनी अवघ्या १५ दिवसांत जवानांसाठी १६ हजार कोटींची संरक्षण सामुग्री खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आपलं सामर्थ्य ८० टक्क्यांपर्यंत वाढलं,' असं निंभोरकर यांनी सांगितलं. पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती दाखवली. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतरदेखील आपलं सैन्यदल कारवाईस सज्ज होतं. मात्र त्यावेळी राजकीय इच्छाशक्ती कमी पडली, असं ते म्हणाले.
उरी हल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला फोन करुन सर्जिकल स्ट्राइकबद्दल विचारणा केली होती. आपली तयारी असेल, तर लवकरात लवकर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. पर्रिकर यांनी सैन्याला पूर्णपणे सूट दिली होती. त्याशिवाय अत्याधुनिक शस्त्रास्त्रंदेखील दिली होती. यानंतर २९ सप्टेंबरचा दिवस निश्चित करण्यात आला. ती कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली. यामध्ये पर्रिकर यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महत्त्वाची ठरल्याचं निंभोरकर यांनी म्हटलं.