तिसरी लाट टाळता येईल, वैज्ञानिक सल्लागार राघवन यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:26 AM2021-05-08T06:26:38+5:302021-05-08T06:27:09+5:30
वैज्ञानिक सल्लागार राघवन; लसीकरण व नियमांचे पालन गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाविषयक नियमांची त्रिसूत्री, मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि योग्य काळजी घेतल्यास तिसरी लाट कदाचित येणारही नाही, असे मत केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन त्यांनी व्यक्त केले आहे. राघवन यांनी तिसऱ्या लाटेबाबत मार्गदर्शक भूमिका मांडून तिसऱ्या लाटेबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
कोरोनाची तिसरी लाट कशी रोखता येईल, याबाबत राघवन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संसर्ग रोखण्यासाठी योग्य काळजी घेतल्यास कोरोनाची तिसरी लाट कदाचित देशात सर्वत्र एकाच वेळी येणार नाही. कदाचित येणारही नाही. देशभरात महामारीचे वेगवेगळे परमोच्च बिंदू आणि घट असते. संसर्गाची लाट आणि त्याबाबतच्या आकडेवारीवर बोलण्यापेक्षा वेळ, स्थान आणि तीव्रतेवर चर्चा करणे अधिक फायद्याचे ठरेल. महामारीची लाट हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. आपण संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्यास तिसरी लाट कदाचित येणार नाही. चाचणी, उपचार आणि प्रतिबंध या त्रिसूत्रीचे पालन केल्यास छुपे व लक्षणे नसलेल्यांपासून होणारा संसर्ग रोखता येऊ शकतो, असे राघवन म्हणाले.
विषाणूला अजिबात संधी देऊ नका
विषाणूला संधी मिळाली की, संसर्गाचे प्रमाण वाढते. मोठ्या प्रमाणावर लसीकरण, तसेच सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास विषाणूला संधी मिळत नाही. मात्र, संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे पाहून महामारी संपली, असा विचार करणे चुकीचे ठरेल.
- के. विजय राघवन,
प्रमुख वैज्ञानिक सल्लागार,
केंद्र सरकार
काय म्हणाले राघवन?
n सद्यस्थितीत होत असलेल्या विषाणूचा संसर्ग पाहता, कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा राघवन यांनी दिला होता.
n ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, त्यासाठी आपण तयार राहायला हवे, असे ते म्हणाले होते.
n संसर्गासोबत लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीही वाढली. याच्या एकत्रित परिणामामुळे पहिली लाट रोखण्यात यश आले होते.
n महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगडसह काही राज्यांमध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.
n या राज्यांमध्ये २७ ते ३० एप्रिल या कालावधीत परमोच्च बिंदू गाठून कोरोनाची लाट ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
n भारतात दुसरी लाट ओसरण्यास १५ मेनंतर सुरुवात होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
इशाऱ्यानंतर वाढली होती सगळ्यांचीच चिंता
राघवन यांनी दोन दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होती. दुसऱ्या लाटेतच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावला आहे, तसेच केंद्र सरकारवर देशव्यापी लॉकडाऊन लावण्यासाठीही दबाव वाढत आहे.
‘स्पुतनिक लाइट’ला रशियाची मंजुरी
रशियाने स्पुतनिक लाइट ही नवी कोरोना लस बनविली असून तिच्या आपत्कालीन वापरास पुतीन सरकारने मान्यता दिली. स्पुतनिक लाइट लस एका डोसची असून ती ८० टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाने याआधी बनविलेली स्पुतनिक व्ही लस भारतातील लसीकरण मोहिमेमध्ये आता वापरण्यात येणार आहे. जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे.