डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने साथीची स्थिती उत्तम हाताळली, प्रख्यात शास्त्रज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:15 AM2021-06-25T10:15:51+5:302021-06-25T10:16:01+5:30

प्रख्यात शास्त्रज्ञांचे मत; महाराष्ट्राने साथीची स्थिती उत्तम हाताळली

The third wave is unlikely due to Delta Plus; Maharashtra handled the epidemic well, according to eminent scientists pdc | डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने साथीची स्थिती उत्तम हाताळली, प्रख्यात शास्त्रज्ञांचे मत

डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने साथीची स्थिती उत्तम हाताळली, प्रख्यात शास्त्रज्ञांचे मत

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस या प्रकारामुळे देशात या साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असे इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी)चे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले. महाराष्ट्राने कोरोना स्थितीमुळे निर्माण झालेली बिकट स्थिती व्यवस्थितरीत्या हाताळली, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याविषयी डॉ. अग्रवाल म्हणाले की, तशी लाट येण्याच्या शक्यतेबद्दल सध्या तरी कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत. डेल्टा विषाणूला शोधण्यासाठी महाराष्ट्रातून एप्रिल-मे महिन्यापासून कोरोना विषाणूचे सुमारे ३५०० नमुने गोळा करण्यात आले. त्यांच्या तपासणीनंतर त्यात डेल्टा प्लस विषाणू सापडले; पण त्यांची संख्या अगदीच नगण्य होती.

आयजीआयबी संस्था केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या अख्यत्यारित येते. तिचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी ‘लोकमत‘ला सांगितले की, महाराष्ट्रातून कोरोनाचे नमुने गोळा करण्यासाठी व सखोल अभ्यासाकरिता आयजीआयबीने त्या राज्याशी विशेष करार केला आहे. इन्सोकॉग ही आणखी एक संस्था डेल्टा विषाणूंचे अस्तित्व शोधण्यासाठी कोरोनाचे ४५ हजार नमुने गोळा करण्याची शक्यता आहे.

डेल्टा प्लस विषाणूचा तिसरी लाट येण्याशी काही संबंध आहे, असे सुचविणारा एकही पुरावा मिळालेला नाही. आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने कोरोना स्थिती अतिशय उत्तमरीत्या हाताळली आहे. ते म्हणाले की, अजून कोरोनाची दुसरी लाट सरलेली नाही. नव्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे बेसावध न राहता आपण प्रतिबंधक नियम यापुढेही पाळत राहिले पाहिजेत.

प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य

येत्या सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार, असे भाकीत कानपूर आयआयटीने केले आहे. त्यावर आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. कानपूर आयआयटीने कोरोनाची दुसरी लाट मार्चमध्ये येणार असे केलेले भाकीत खरे ठरले होते. आता तिसऱ्या लाटेबद्दलचे निरीक्षण नोंदविण्यासाठी कानपूर आयआयटीमधील प्रा. राजेश रंजन व महेंद्र वर्मा यांनी सखोल अभ्यास केला होता. त्याचा निष्कर्ष त्यांनी नुकताच जाहीर केला.

कोरोनामुळे आतापर्यंत एकूण तीन लाख ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला तर एकूण रुग्णांची संख्या ३,००,८२,७७८ झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ६,२७,०५७ असून एकूण रुग्ण संख्येत हे प्रमाण २.०८ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६.६१ टक्के झाले आहे.

Web Title: The third wave is unlikely due to Delta Plus; Maharashtra handled the epidemic well, according to eminent scientists pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.