तुरुंगातील कोविड उपचार केंद्रातून १३ कैदी पसार, शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:04 AM2021-05-10T07:04:56+5:302021-05-10T07:06:02+5:30
रेवाडीचे पोलीस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी सांगितले की, हरियाणातील विविध तुरुंगातील कोरोनाबाधित कैद्यांना उपचारासाठी या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
चंदीगड : हरियाणातील रेवाडी तुरुंगातील कोविड - १९ उपचार केंद्रातून १३ कैदी पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. या कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली असून, रेवाडी पोलीस नरनौलसह शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांशी समन्वय साधून आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शनिवारी आणि रविवारदरम्यानच्या रात्री ही घटना घडली. रेवाडी तुरुंगातील एका विशेष कक्षातील या कैद्यांनी बराकीची लोखंडी जाळी कापली. पळ काढण्यासाठी त्यांनी अंथरुण - पांघरुणांच्या दोरीचा वापर केला. राज्यातील कोविड-१९ ग्रस्त कैद्यांसाठी सध्या या तुरुंगाचे रुपांतर कोविड समर्पित उपचार केंद्रात करण्यात आले आहे.
राज्यातील विविध भागातील ४९३ कोरोनाबाधित कैद्यांनी रेवाडी तुरुंगातील विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे.
रेवाडीचे पोलीस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी सांगितले की, हरियाणातील विविध तुरुंगातील कोरोनाबाधित कैद्यांना उपचारासाठी या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
चौकशीचे आदेश
- रेवाडी आणि महेंद्रगढमधील खून, चोरी, बलात्काराचे गुन्हे असलेल्या कैद्यांचा यात समावेश आहे. त्यांना नरनौल तुरुंगातून रेवाडी येथे आणण्यात आले होते.
- सकाळी कैद्यांची नियमित हजेरी घेताना तेरा कैदी बेपत्ता असल्याचे आढळले, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
- याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तुरुंग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी केली जात आहे.