तेरा वर्षांच्या मुलीला दारू पाजून केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:43 IST2018-04-26T00:43:54+5:302018-04-26T00:43:54+5:30
महिलेच्या प्रियकराने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना येथील दिल्लीच्या पूर्वेकडील शाहबाद डेअरी भागात घडली आहे

तेरा वर्षांच्या मुलीला दारू पाजून केला बलात्कार
नवी दिल्ली : एका विवाहीत महिलेने आपल्या १३ वर्षाच्या भाचीला बळजोरीने दारू पाजली आणि त्यानंतर महिलेच्या प्रियकराने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना येथील दिल्लीच्या पूर्वेकडील शाहबाद डेअरी भागात घडली आहे. १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारास फाशी देण्याच्या वटहुकुमाला ज्या दिवशी मंजुरी मिळाली त्या २२ एप्रिल रोजीच बलात्काराची ही घटना घडली. पीडित मुलीने हा सारा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर तिला तातडीने बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर एक दिवस उपचार करून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणी या मुलीच्या मावशीला अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर मुकेशकुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मुलीची आई तिच्यासोबत राहात नाही. त्यामुळे ती वडिलांसह राहते. त्यांच्या घराशेजारीच तिच्या मावशीचे घर आहे. तीच आतापर्यंत मुलीचा सांभाळ करीत होती. या मावशीने शीतपेयामध्ये दारू मिसळून ते या मुलीला बळजोरीने पाजले. दारूचा अमल चढल्यावर मुकेशकुमारने या मुलीवर तिच्या मावशीच्या उपस्थितीच बलात्कार केला. हा सारा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
शुद्धीत आल्यानंतर ही मुलगी आपल्या घरी परत गेली. सोमवारी सकाळी मुलीला रक्तस्राव व असह्य वेदना होऊ लागल्याने हा सारा प्रकार उघडकीस आला.