...अन् ते काश्मिरी पंडित 30 वर्षांनी खोऱ्यात परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 10:53 AM2019-05-02T10:53:44+5:302019-05-02T10:54:19+5:30
जम्मू-काश्मीरमधला एका मोठा उद्योगपती आणि काश्मिरी पंडित पुन्हा एकदा खोऱ्यात परतले आहेत.
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधला एका मोठा उद्योगपती आणि काश्मिरी पंडित पुन्हा एकदा खोऱ्यात परतले आहेत. श्रीनगरमधल्या गडा कोचा इथे फारच गर्दी असते. या गर्दीतल्या अशाच एका रोशल लाल मावा यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. मावा हे काश्मिरी पंडित आहेत, त्यांचं वय 70 वर्षांच्या जवळपास आहे. 30 वर्षांनंतर ते दिल्लीतला स्वतःचा व्यापार आणि कोट्यवधींचं घर सोडून काश्मीरमध्ये परतले आहेत.
30 वर्षांपूर्वी श्रीनगरच्या जैना कदालमध्ये मावा हे प्रसिद्ध व्यापारी होते. 1990मध्ये कथित स्वरूपात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यात ते जखमी झाले. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यात त्यांच्या पोटाला आणि पायाला गोळी लागली. गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मावा सांगतात, हल्ल्याच्या काही दिवसांनंतर सामानाची बांधाबांध करत जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसाठी तयार करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये आम्ही राहायला लागलो. मावा यांच्याबरोबर पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी होती. त्यांचा एक मुलगा काश्मीरमध्ये राहत होता. परंतु त्याला समजावल्यानंतर तोही दिल्लीत आला आणि त्यानं खडी बावलीमध्ये मसाल्यांचा व्यापार सुरू केला.
मावा म्हणाले, सुरुवातीला मला फार कष्ट घ्यावे लागले. परंतु दिल्लीतल्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी माझ्याबरोबर व्यापार करण्यास कधीही विरोध केला नाही. मी आज दिल्लीतील यशस्वी व्यापारी आहे. माझ्या घराची किंमत 20 कोटी रुपयांहून जास्त आहे. परंतु मी काश्मीरला कधीही विसरू शकत नाही. आता 30 वर्षांनंतर मी दिल्ली सोडून काश्मीरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरसाठी मी काहीही सोडू शकतो. मावा यांच्या जुन्या दुकानाची दुरवस्था झाली होती. परंतु त्यांनी ते दुकान पुन्हा सुरू केलं आहे.
ते सांगतात, गेल्या 30 वर्षांत बऱ्याचदा काश्मीरमध्ये गेलो. काही दिवस तिथे थांबलो. गेल्या पाच वर्षांत काश्मीरची परिस्थिती बिघडलेली आहे. तरीही मला तिथे राहायला आवडेल. कारण मला ती जागा सुरक्षित वाटते. काश्मीर आणि काश्मिरी नागरिकांची बाहेर प्रतिमा मलिन केली जात आहे. काश्मिरी पंडितांसाठी वेगळी कॉलनी बनवण्याची गरज नाही. जे लोक अशा प्रकारची मागणी करतात, ते राजकारण करत असल्याचंही मावा म्हणाले आहेत.