"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:33 PM2024-09-21T15:33:11+5:302024-09-21T15:34:27+5:30
Amit Shah : ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे, असे अमित शाह म्हणाले.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी निवडणुकीत होत आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू-काश्मीरमधील मेंढर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका. ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे. अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी ही तीन घराणं आहेत. या तिन्ही घराण्यांनी इथे लोकशाही थांबवली होती. जर, २०१४ मध्ये मोदींचे सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा निवडणुका झाल्या नसत्या, असे अमित शाह म्हणाले.
याचबरोबर, अमित शाह यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादासाठी या तीन कुटुंबांना जबाबदार धरले. ते म्हणाले, ९० च्या दशकात फारुख यांच्या मेहरबानीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आला. ९० च्या दशकात इथे मोठ्या प्रमाणात गोळीबार व्हायचा, कारण इथले सूत्रधार पाकिस्तानला घाबरत होते. पण आता पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरत आहे. गोळीबार करण्याचे त्यांच्यात धाडस नाही. गोळीबार झाला तर गोळीबाराला गोळ्यांनी उत्तर दिले जाईल, असे अमित शाह म्हणाले.
आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला असून तरुणांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप दिले आहेत. एक काळ असा होता की तरुणांची स्वप्ने पायदळी तुडवली जायची आणि आज अशी वेळ आली आहे जेव्हा मोदी सरकारच्या धोरणांमुळे अमृत पिढी जगामध्ये देशाचे नाव तर उंचावत आहेच, शिवाय एक महत्त्वाचे कार्य करत आहे. विकसित भारताच्या उभारणीत योगदान देत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील लोकांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, मोदी आल्यानंतर ओबीसी, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल आणि पहाडींना आरक्षण मिळाले. मी विधेयक मांडले तेव्हा फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाने त्याला विरोध केला आणि येथील त्यांनी गुर्जर बंधूंना भडकावण्यास सुरुवात केली. मी राजौरीला आलो तेव्हा गुर्जर बांधवांचे आरक्षण कमी करणार नाही, असे वचन दिले होते. तर आम्ही गुर्जर, बकरवाल आणि पहाडींनाही बढतीत आरक्षण देण्याचे सांगत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.