"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:54 PM2024-05-22T16:54:56+5:302024-05-22T17:00:36+5:30
Lok Sabha Election 2024: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि अभ्यासक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारतानाच भाजपाला मागच्या वेळच्या ३०३ पेक्षा थोड्या जास्त किंवा तेवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला आहे. मात्र मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकल्या तरी ही निवडणूक मोदींची (Narendra Modi) बेस्ट इनिंग नसेल, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतर आता या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबत राजकीय विश्लेषक आकडेवारीसोबत अंदाज व्यक्त करत आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि अभ्यासक प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारतानाच भाजपाला मागच्या वेळच्या ३०३ पेक्षा थोड्या जास्त किंवा तेवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला आहे. मात्र मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकल्या तरी ही निवडणूक मोदींची बेस्ट इनिंग नसेल, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.
प्रशांत किशोर या निवडणुकीतील भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य कामगिरीबाबत भाकित करताना म्हणाले की, अधिक जागा जिंकूनही ही निवडणूक मोदींची बेस्ट इनिंग नसेल. ही बाब समजावून देताना प्रशांतकिशोर यांनी क्रिकेटचं उदाहरण दिलं. ते म्हणाले समजा विराट कोहलीने एका डावात अगदी प्लॉलेस १०१ धावा काढल्या आणि अन्य कुठल्या तरी दुसऱ्या डावात विराटने १४० धावा काढल्या. मात्र त्या खेळीदरम्यान त्याचे सहा झेल सुटले. रेकॉर्डवर दोन्ही खेळींसमोर शतक असा उल्लेख असेल. मात्र तुम्ही कुठल्या खेळीला उत्तम मानणार? जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा रेकॉर्ड बुकमध्ये हे सुद्धा लिहिलं जाईल की, जर झेल सुटले नसते तर कदाचित... तसेच तुम्ही विराट कोहलीला जरी विचारलं की दोन्हींपैकी उत्तम खेळी कुठली होती, तरी तो १०१ धावा काढली खेळी उत्तम होती असं सांगेल.
त्यामुळेच मी सांगतो की, २०१४ चा विजय नरेंद्र मोदींचा प्लॉलेस विजय होता. तो अपेक्षांचा विजय होता. लोकांना वाटत होतं की मोदी येतील आणि देश बदलेल. तर २०१९ मधील मोदींचा विजय हा विश्वासाचा विजय होता. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींना विश्वासाने मतदान झालं होतं. मात्र २०१४ मधील मोदींचा विजय हा कुठला अन्य पर्याय नसल्याने मिळालेला विजय असेल. २०१४ मध्ये मोदींसमोर कुठलाही चांगला आव्हानवीर उभा राहिला नाही. मोदी जिंकून येतील आणि सरकार स्थापन करतील, हे नाकारता येणार नाही. मात्र मोदींसाठी जी अंधभक्ती होती. जो विश्वास होता. जो पाठिंब होता, तो कुठल्याही लोकनेत्याची ताकद असते. मात्र त्याचं प्रमाण आता कमी झालं आहे, असं निरीक्षण प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, त्यामुळेच यावेळी जमिनीवर मोदींच्या नावाची कुठलीही लाट दिसत नाही आहे. अॅनॅलिटिकल टुल्स, डेटा आणि मुलाखतींचा टीआरपी, सर्वांना एकत्र करून पाहिल्यास इंटेन्सिटीमध्ये घट झाली आहे. पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मोदींसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानाबाबत बोलताना प्रशांत किशोर ायंनी सांगितले की, देशाच्या ग्रामीण भागातील असंतोष आता हळुहळू मोठा मुद्दा बनत चालला आहे. दुसरा मुद्दा असमानता आहे, तो सिटिंग टाइमबॉम्ब आहे. तसेच बेरोजगारी हाही एक गंभीर मुद्दा आहे. या तिन्ही गोष्टी कुठल्याही सरकारसाठी आव्हान बनणार आहेत.