हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:54 AM2024-02-21T05:54:41+5:302024-02-21T05:55:10+5:30
एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.
नवी दिल्ली : भाजपला ऐक्याने, चांगले नियोजन, रणनीती आणि मेहनतीने पराभूत करता येते, असा देशाला मोठा संकेत चंडीगडच्या महापौर निवडणुकीतील ‘इंडिया’ आघाडीच्या पहिल्या आणि अतिशय महत्त्वाच्या विजयाने दिला असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली.
एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले.
आज ’ते’ अतिशय आत्मविश्वासाने लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्याचा दावा करताना आम्हाला तुमच्या मतांची गरज नाही, असे जनतेला आव्हानच देत आहेत. हा आत्मविश्वास कुठून येतो? काहीतरी गडबड करून ठेवली असणार त्यांनी, अशी शंका केजरीवाल यांनी व्यक्त केली.
दरम्यान, लोकशाहीच्या हत्येचा भाजपने कट रचला असून चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीतील निवडणूक अधिकारी असलेला अनिल मसिह हा एक प्यादे आहे. या कटामागे असलेला चेहरा वेगळाच आहे. असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
हा प्रकार विद्यमान सत्ताधाऱ्यांनी रचलेल्या कटाच्या हिमनगाचे एक टोक आहे. संविधानावर होणाऱ्या हल्ल्यांचा सर्व भारतीयांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील लोकशाहीची धिंडवडे निघण्याचा धोका आहे.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
अखेर सत्याचाच विजय झाला. निवडणुकीत गैरप्रकार करणाऱ्या भाजपला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सणसणीत चपराक बसली आहे. लोकशाहीच्या झालेल्या विजयाबद्दल मी चंडीगडच्या नागरिकांचे
अभिनंदन करतो.
- भगवंत मान, पंजाबचे मुख्यमंत्री