Karnataka election: प्रचार दौऱ्याची सुरुवात न्यायालयातून हा शुभशकुन - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:49 PM2023-05-03T16:49:08+5:302023-05-03T16:52:28+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत बेळगावात दाखल

This is an auspicious sign from the court starting the campaign tour says MP Sanjay Raut | Karnataka election: प्रचार दौऱ्याची सुरुवात न्यायालयातून हा शुभशकुन - संजय राऊत

Karnataka election: प्रचार दौऱ्याची सुरुवात न्यायालयातून हा शुभशकुन - संजय राऊत

googlenewsNext

बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी बेळगावला आलो आहे. बेळगावच्या माझ्या प्रचार दौऱ्याची सुरुवात न्यायालयातून होतेय हा शुभशकुन आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. बेळगाव न्यायालय आवारात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता खासदार संजय राऊत आज बुधवारी दुपारी विमानाने बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. न्यायालयाचे वॉरंट असल्यामुळे खासदार राऊत यांनी सर्वप्रथम बेळगाव न्यायालयासमोर हजेरी लावली. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आपल्यावरील वॉरंट बद्दल बोलताना खासदार राऊत यांनी ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. नेता असलो तरी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागते.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना या पद्धतीने त्रास देण्याचे प्रयत्न सुरूच असतात. मी समिती उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी आलो आहे. जामीन मिळाला नसता तर मला अटक झाली असती इतकेच. बेळगाव येथील माझा आजचा दौरा न्यायालयातून होतोय हा शुभ शकुन आहे. सर्वांनी एकत्र संघटित रहावे अशी माझी अपेक्षा आहे, असेही राऊत म्हणाले.

..मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करतायत

सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी यापूर्वी महाराष्ट्रातील छगन भुजबळ वगैरे यांच्यासारखे अनेक नेते येत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करणे ही आमची वचनबद्धता आहे. त्यामुळे या भागात आम्ही महाराष्ट्रातील नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. मात्र तरीही महाराष्ट्रातील भाजप नेते येथे येऊन त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मात्र ठरले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती खेरीज अन्य पक्षाचा प्रचार करणे वगैरे गोष्टी आम्ही टाळल्या आणि पाळल्या आहेत.

ही तुमची महाराष्ट्रावरील निष्ठा म्हणायची का? 

मला आत्ताच कळाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत. मी त्यांना आवाहन केले आहे, तुमचा दावा असतो की आम्ही बेळगावात तुरुंगात गेलो होतो. अरे तुरुंगात गेला होता तर आता मुख्यमंत्री आहात तेंव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला या. हे करण्याऐवजी उलट महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी येथे खोके पाठवण्यात आले आहेत असे सांगून ही तुमची महाराष्ट्रावरील निष्ठा म्हणायची का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

बेळगावमध्ये निवडणूक प्रचाराची तोफ डागण्यासाठी आलेल्या खासदार राऊत यांची प्रथम खानापूर येथे भव्य रॅली आणि तेथील अर्बन बँक चौकात जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर बेळगावातील कारभार गल्ली, वडगाव परिसरात सायंकाळी 6 वाजता आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चौक येथे रात्री 8 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण आणि यमकनमर्डी मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संयुक्त अशी ही जाहीर सभा होईल. याचबरोबर गणेशपुर येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल. तरी समिती प्रेमी नागरिकांसह समस्त जनतेने खासदार संजय राऊत यांच्या सभांना मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींकडून करण्यात आले आहे.

Web Title: This is an auspicious sign from the court starting the campaign tour says MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.