याला म्हणतात 'मास्टर प्लॅन...'! थाळी, घंटा अन् ढोल वाजवत मतदानासाठी घराबाहेर पडा; PM मोदींचा कार्यकर्त्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:43 IST2025-02-03T13:42:47+5:302025-02-03T13:43:15+5:30
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आरके पुरम येथील जाहीर सभेला संबोधित करताना विजयाचा पूर्णविश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मतदानाच्या दिवशी 'थाळी-घंटा आणि ढोल' वाजवण्याचे आवाहन केले, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

याला म्हणतात 'मास्टर प्लॅन...'! थाळी, घंटा अन् ढोल वाजवत मतदानासाठी घराबाहेर पडा; PM मोदींचा कार्यकर्त्यांना सल्ला
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज सोमवारी सायंकाळी थांबेल. या निवडणुकीच्या पारश्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसने मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी संपूर्ण शक्तीनीशी प्रयत्न केले. दिल्लीतील भाजपचा वनवास संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक सभांमधून मतदारांना आपल्याबाजूने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रविवारी आरके पुरम येथील जाहीर सभेला संबोधित करताना विजयाचा पूर्णविश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मतदानाच्या दिवशी 'थाळी-घंटा आणि ढोल' वाजवण्याचे आवाहन केले, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी? -
पंतप्रधान म्हणाले, "दिल्लीला या 'आपदा'पासून मुक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावर किमान ५ भाजप समर्थकांना सोबत घेऊन जावे आणि भाजपला मत मिळवून द्यावे. 'लोकशाही हा एक उत्सव आहे. निवडणुकीच्या दिवशी, २०-२५ जणांचा एक गट करून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा. थाळी वाजवत जा, घंटा वाजवत राहा. ढोल वाजवत जा. उत्सव साजरा करा, लोकशाहीचा उत्सव साजरा करा."
का केलं असेल थाळी, घंटा अन् ढोल वाजवण्याचं आवाहन? -
राजकीय तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधानांच्या या आवाहनामागे एक विशेष कारण आहे. ही निवडणूक म्हणजे, आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील चुरशीची लढाई मानली जात आहे. येथील अधिकांश लोक सामना ५०-५० आहे' आहे, असे बोलताना दिसत आहेत. मात्र, 'जय' आणि 'पराजया'चा हा संपूर्ण खेळ स्विंग मतदारांवर अवलंबून असतो. स्विंग मतदार म्हणजे असे मतदार जे सरकारची कामगिरी, यशापयश अथवा वातावरणानुसार कुणाला मतदान करायचे हे ठरवतात. याशिवाय, काही स्विंग मतदार असेही असतात, जे जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षाला मतदान करतात. अशा मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष आपापल्या विजयाची घोषणा करत असतात.
तज्ज्ञांच्या मते, अशाच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना थाळी-घंटा आणि ढोल वाजवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. जर एखाद्या मतदाराने अखेरपर्यंत कुणाला तदान करायचे हा निर्णय घेतला नसेल, तर अशा मतदारा आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.